बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती–भिगवण रस्त्यावरील मिलिंद ट्रेडिंग कंपनीसमोर एका भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती–भिगवण रस्त्यावरून जात असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
रस्त्यावर वाहतूक कोंडी, नागरिकांनी पोलिसांना केली मदत
अपघाताची तीव्रता जास्त असल्याने काही वेळातच या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रस्त्यावरील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी स्थानिक बारामतीकरांनी उत्स्फूर्तपणे पुढे येत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.
ओळख पटवण्याचे काम सुरू
मयत व्यक्तीचे नाव व अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसून, माहितीनुसार बाळू भिसे असे दुचाकीवरील मृताचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील हे दोन्ही असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.










