सातारा : आकाशपाळणा उभारणीसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. दीपक लक्ष्मण पोळ असे लाचखोर हवालदाराचे नाव असून, लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराने सातारा शहरातील आळूचा खड्डा परिसरात आकाशपाळणा बसवण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा परवाना मिळवून देण्यासाठी हवालदार दीपक पोळ याने पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नावाखाली तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
पडताळणी आणि सापळा..
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी थेट सातारा एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी राजवाडा परिसरातील जुन्या दवाखान्यासमोर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून तडजोडीअंती ११ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार दीपक पोळ याला पथकाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
हवालदाराने लाचेची रक्कम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावे मागितल्याचे आणि त्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आल्याने पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा परवान्यासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी निर्भयपणे १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.










