उपेंद्र धोंडे, भूजलशास्रज्ञ पुणे
भूजलधारकांची रचना खरोखर कळू शकते का? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्रातील जलधारकांबाबतीत सांगायचे तर अत्यंत आव्हानात्मक असेच म्हणता येईल. जलधर (aquifer) हा काही एखाद्या साध्या भूमिगत टाकीप्रमाणे नसतो कि, त्याला जमिनीखाली अमुक जलधर अमूक आकाराचा आहे व त्यात नेमके इतके लिटर पाणी आहे हे सांगता येईल. अशी संपूर्ण अचूकता देणे बेसाल्ट या खडकातील जलधराबाबत तरी शक्य नसते.
शिवाय त्या त्या भूजल वैज्ञानिकाचा भूजल विज्ञानाचा अभ्यास-अनुभव आणि उद्देश -प्रसंगानूसार रिझल्ट वेगवेगळे असू शकतात, त्याचे परिणाम देखील कमी-जास्त प्रमाणात अचूक असू शकतात. परंतु, म्हणून “हे शास्त्रच निरूपयोगी आहे” असा अर्थ काढता येत नाही. कारण हे म्हणणे म्हणजे, “पेशंट बरा होऊ शकला नाही म्हणून दवाखाने व वैद्यकीय शास्त्रच नको”.
आपल्या जल गरजांचा व त्यांच्या व्यवस्थापनाचा आजवरचा अनुभव पाहता, हे नक्कीच मान्य केले पाहिजे की, भूजलशास्त्र हा एक अत्यंत मूलभूत परंतु तितकाच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात भोंदूंचे फावते. हा नियम सर्वच क्षेत्रात लागू पडतो की, जिथं गरज मोठी, वैज्ञानिक दृष्टिकोन कमी, तिथे फसवणूक जास्त. म्हणूनच, या क्षेत्रात जलजागृती महत्त्वपूर्ण आहे आणि सहज जलबोध अभियान माध्यमातून आम्ही ती करत आहोत.
सर्वप्रथम, एकच संरचना सर्वत्र चालणार नाही हे समजून घेऊ. यासाठी जलधर क्षमता कशी निर्माण होते हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी जलधर खडक रचना अनुकूल असावी लागते. ही अनुकूलता, प्रतिकूलता मोजता येते. जसे की, एखाद्या गावासाठी, प्रथम पाणलोट क्षेत्र नकाशा हाती असू द्या, त्यावर संपूर्ण जलप्रणाली ( Drainage layer) दाखवा. या जलप्रणालीच्या पैटर्नचा अभ्यास करून कोणत्या जागेतून किती अपधाव निर्माण होतो, वाहतो वा साठू शकतो याची गणितीय मांडणी शक्य आहे.
या गणितीय मांडणीच्या आधारे आपण जलप्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी, मृदा धूप थांबविण्यासाठी असलेल्या पाणलोट उपचारांचे नियोजन करू शकतो. तसेच याच आधारावर भूपृष्ठजल साठवण संरचनांसाठीच्या जागा निश्चित करू शकतो. याचा पुढील टप्पा म्हणजे जलधर विज्ञान. जलधर नेमका कसा आहे? त्याचा विस्तार व क्षमता कशी तपासायची?
जलधर समजून घेण्यासाठी, पाणलोट व जलप्रणाली नकाशा सोबतच आपल्याला खालीलप्रमाणे माहिती आवश्यक आहे. जसं की खडक रचना, बोअरवेल -विहिरींची खोली व जलपातळी, भूभौतिकीय सर्वेक्षण आणि काही जल प्रात्यक्षिके ( pumping test, infiltration tests etc). या व्यतिरिक्त ऋतुमानानुसार पर्जन्य बदल, भूजल उपसा स्थिती यांच्या आधारे पाणलोटातील भूजलधारकाची संकल्पनात्मक रचना (conceptual aquifer model) तयार करता येते व त्याचे गुणधर्म ओळखले जातात जे पुढे भूजलाचा शोध, जलधराची क्षमता, पुनर्भरण संरचना निर्माणासाठी स्थळ निश्चिती तसेच परिणामकारकता तपासणी यासाठी वापरता येतात. याच धर्तीवर पुनर्भरण झालेले पाणी नेमके कुठे आणि किती गेले हे देखील मोजता येते.
बरेचदा एखाद्या पुनर्भरण संरचनेतून प्रत्यक्ष मुरलेले पाणी आणि उपलब्ध भूजलसाठ्यात झालेली निव्वळ वाढ ही दोन वेगवेगळी मोजमापं आहेत. यासाठी पुनर्भरण प्रक्रियेतील प्रत्यक्ष झिरपा दर, अध:प्रवाह ( baseflow /lateral flow), बाष्पीभवन, नैसर्गिक वापर इत्यादी परिणाम नीटपणे समजून घ्यावे लागतात म्हणजे नेमकी आकडेवारी समजू शकते. याच माहितीच्या अभावामुळे पुनर्भरण संरचनांचे यश मोजणे वैज्ञानिकदृष्ट्या न ठरवता सरळसोट अवैज्ञानिक अडाणीपणाचे दावे केले जातात.
शोषखड्डा/जलतारा, समतल चर, विहिर-बोअरवेल पुनर्भरण, पाझर तलाव आणि तत्सम संरचनांच्या पुनर्भरण क्षमता एकसारख्या नसतात. संरचना आकार, खोली, स्थळ, पाणलोट स्थिती व खडक रचना त्यानूसार त्या ठरतात. एखाद्या पुनर्भरण संरचनेतून क्षमता किती निर्माण झाली आहे हे सांगता येते का?होय, निश्चित सांगता येईल. त्यासाठी पाणलोटात ती संरचना नेमकी कुठं निर्माण केली त्या जागेशी संबंधित transmissivity, storativity/specific yield, saturated thickness, groundwater-level fluctuation, well yield आणि aquifer geometry यांसारख्या घटकांच्या आधारे हा अंदाज आपण घेऊ शकतो.
भूपृष्ठीय साठवणूक अधिक व्यवहार्य नाही का? याचे उत्तर आहे, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी गृहीत धरल्यास काही परिस्थितींमध्ये निश्चितच ते उपयुक्त तर काही परिस्थितीत नूकसानीचे ठरते. भूजल साठा कि भुपृष्ठजलसाठा? जलधर क्षमता विकास कि तलाव निर्माण? असा प्रश्न उपस्थित केला तर याचे उत्तर दोहोंपैकी एक असे असत नाही तर स्थानिक परिस्थितीनुसार दोहोंचा आदर्श एकत्रित प्रभाव हे आहे. भूजलात “साठा” जमिनीखाली विखुरलेला असल्याने साठा आणि वापर यांच्यातील संबंध लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही परंतु त्याची क्षमता मोठी आहे.
उघड्या जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाणी बाष्पीभवन म्हणून निघून जाऊ शकते, तलावासाठी जमिनीची उपलब्धता, मोठे क्षेत्र आवश्यक असते, भौगोलिक विषमता असू शकते, आर्थिक मर्यादा आहेत, हंगामी उपलब्धता प्रश्न पडतो, म्हणूनच भूजलाचा पर्याय म्हणून तलाव वा अन्य भुपृष्ठजलसाठे असे मानता येत नाही. त्यामुळे प्रश्न भूजल की भूपृष्ठीय जल? असा नसावा. प्रश्न असा असावा की, पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कोणता भाग कुठे साठवला तर सामाजिक, आर्थिक आणि जलवैज्ञानिक दृष्ट्या सर्वाधिक उपयुक्त ठरेल? काही पाणी भुपृष्ठावर, तर काही जलधरांमध्ये ठेवणे योग्य राहील.
भूजल दिसत नाही म्हणून त्यावर आधारित व्यवस्थापन करता येत नाही हेही बरोबर नाही. योग्य माहिती आधारे परिणामकारकता तपासणी करून या अदृश्य साठ्याचे व्यवस्थापन करता येते. म्हणून व्यवहार्य दिशा अशी दिसते: पावसाचे पाणी योग्य ठिकाणी अडवा. काही भाग जमिनीवर साठवा. काही भाग भूजल पुनर्भरण म्हणून निर्माण करा. भूजलाचा नियंत्रित उपसा ठेवा. प्रत्यक्ष जलपातळी व वापरावर आधारित पुनर्नियोजन करा. हीच संकल्पना एकच उपाय सर्वत्र या दृष्टिकोनापेक्षा अधिक वैज्ञानिक ठरते.










