• Contact us
  • About us
Tuesday, September 29, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिवृष्टी -पूरानंतरही विहिरी-बोअरवेल कोरडेच का? धाराशिवच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या भूजल पुनर्भरणाचा वैज्ञानिक वेध!

mahaanewslive by mahaanewslive
September 27, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, मराठवाडा, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, विदर्भ, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
अतिवृष्टी -पूरानंतरही विहिरी-बोअरवेल कोरडेच का? धाराशिवच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या भूजल पुनर्भरणाचा वैज्ञानिक वेध!

उपेंद्र धोंडे, भूजलशास्रज्ञ (9271000195)

पावसाळ्यात एखाद्या परिसरात मुसळधार पाऊस पडतो, नदी-नाले दुथडी भरून वाहतात, ओढ्यांना पूर येतो आणि काही तासांत किंवा दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाणी परिसरातून वाहताना दिसते. अशा वेळी सामान्यांच्या मनात एक स्वाभाविक अपेक्षा निर्माण होते कि, इतके पाणी आले आहे, तर विहिरी आणि बोअरवेल भरल्या पाहिजेत आणि भूजलपातळी दीर्घकाळ उंचावली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी चित्र वेगळे दिसते. अतिवृष्टीनंतर काही विहिरींमध्ये पाणीपातळी वाढते, काही बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध होते; परंतु पाऊस थांबल्यानंतर अल्पावधीतच हा फायदा कमी होतो. परिणामी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो, पूराचे एवढे पाणी गेले कुठे?

धाराशिव जिल्ह्याचा अभ्यास करतानाचा अनुभव वरील प्रश्नाचा वैज्ञानिक वेध घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दोन दशकांत सन २००५, २००६, २०१३, २०१६, २०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२३ आणि सन २०२५ अशा विविध वर्षांत धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस किंवा पूरस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या.

त्याच कालखंडात या भागात जलसंधारण, पाणी अडविणे आणि कृत्रिम भूजल पुनर्भरणासाठी मोठ्या प्रमाणावर कामे झाली. तरीही अनेक भागांत दीर्घकालीन भूजलसाठ्याची अपेक्षित सुधारणा सर्वदूर दिसत नाही. याचा अर्थ जलसंधारणाची सर्व कामे निष्फळ ठरली, असा अजिबात नाही; उलट या अनुभवातून भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया अधिक सूक्ष्म पद्धतीने समजून घेण्याची आवश्यकता अधोरेखित होते.

भूजलाच्या संदर्भात सर्वप्रथम “पाणी उपलब्धता” आणि “भूजल पुनर्भरण” यांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणे ही एक गोष्ट आहे, तर त्या पाण्यापैकी किती भाग जमिनीत झिरपतो, त्यातील किती भाग जलधरापर्यंत पोहोचतो आणि त्यापैकी किती भाग दीर्घकालीन भूजलसाठ्यात सामील होतो, ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. त्यामुळे पूरस्थिती ही पाण्याच्या प्रचंड उपलब्धतेचे लक्षण असू शकते; पण ती स्वतःमध्ये भूजल पुनर्भरणाचे मोजमाप नाही.

पावसाच्या एका थेंबाचा प्रवास : पावसाचा थेंब जमिनीवर पडल्यापासून त्याचा प्रवास अनेक शक्यतांनी ठरतो. जमिनीवर पडलेल्या पाण्याचा काही भाग मातीमध्ये झिरपतो. काही भाग मातीतील ओलावा वाढवतो. काही पाणी वनस्पती वापरतात. काही भाग बाष्पीभवनातून वातावरणात परत जातो. जमिनीची झिरपण्याची क्षमता ओलांडून पाऊस पडत राहिला तर उर्वरित पाणी पृष्ठीय प्रवाह किंवा अपधाव बनते. हा अपधाव सूक्ष्म नाले, ओढे आणि नदीप्रणालीकडे जातो. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी दिसत असले तरी त्या पाण्याचा भूजल पुनर्भरणात जाणारा हिस्सा त्यापेक्षा खूपच कमी असू शकतो.

यामध्ये पावसाची एकूण मात्रा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्याची तीव्रता, कालावधी आणि वितरण महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ, काही दिवसांत हळूहळू पडणारा मध्यम पाऊस आणि काही तासांत कोसळणारा अतितीव्र पाऊस यांचा भूजल पुनर्भरणावर समान परिणाम होईलच असे नाही. अतितीव्र पावसात जमिनीची प्रारंभिक झिरपण्याची क्षमता लवकरच ओलांडली जाऊ शकते आणि त्यामुळे अपधावाचे प्रमाण वाढू शकते. परिणामी पर्जन्यमान मोठे असूनही प्रभावी पुनर्भरण तुलनेने मर्यादित राहू शकते.

महाराष्ट्रातील बेसाल्ट आणि जलधरांची गुंतागुंतीची रचना : धाराशिवसह महाराष्ट्राच्या मोठ्या भागात डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आढळतो. बेसाल्ट प्रदेशातील भूजलव्यवस्था ही एकसंध भूमिगत जलसाठ्याप्रमाणे समजणे चुकीचे ठरू शकते. बेसाल्टमध्ये भूजलाचा साठा आणि प्रवाह प्रामुख्याने खडकाची झीज, सांधे, जोड, भेगा, स्तरीकरण, विविध खडकस्तरांमधील संपर्क आणि स्थानिक भूगर्भीय संरचना यावर अवलंबून असतो.

एखाद्या ठिकाणी वरच्या बाजूला झिजलेला आणि तुलनेने अधिक पारगम्य थर असू शकतो. त्याखाली कमी पारगम्य बेसाल्टचा थर असू शकतो. त्याखाली पुन्हा भेगायुक्त किंवा सांधायुक्त जलवाहक स्तर असू शकतो. त्यामुळे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या खोलीवर पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती वेगळी असू शकते. दोन जलधरांमध्ये जलवैज्ञानिक संपर्क असेलच असे नाही. काही ठिकाणी पाणी एका स्तरात साचू शकते; परंतु त्याचा खोल जलधराशी संपर्क मर्यादित असू शकतो.

यामुळेच “पाणी जमिनीत मुरले” या विधानानंतर पुढचा प्रश्न विचारणे आवश्यक आहे कि, ते पाणी कोणत्या जलधरात, किती प्रमाणात मुरले? याच प्रश्नाचे उत्तर विहीर किंवा बोअरवेलच्या प्रतिसादासाठी निर्णायक ठरते. एखाद्या विहिरीची पाणीपातळी वाढली म्हणून संपूर्ण परिसरातील जलधर भरला असे होत नाही. उलट एखाद्या खोल बोअरवेलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून संपूर्ण पुनर्भरण झाले नाही, असाही निष्कर्ष काढता येत नाही. स्थानिक भूशास्त्र आणि जलधराची रचना समजून घेतल्याशिवाय विहीरपातळीचा अर्थ लावणे धोकादायक ठरू शकते.

नैसर्गिक पुनर्भरणाची मर्यादा : नैसर्गिक पुनर्भरणासाठी केवळ पाणी उपलब्ध असणे पुरेसे नाही. पाणी जमिनीत प्रवेश करू शकेल अशी पृष्ठभागीय व उपपृष्ठीय परिस्थिती, पुरेशी झिरपण्याची क्षमता आणि संबंधित जलधराशी जलवैज्ञानिक संपर्क आवश्यक असतो. मातीचा प्रकार, मातीची जाडी, मुरुमाचा थर, खडकाची झीज, उतार, जमिनीचे आच्छादन, पिकांची अवस्था आणि स्थानिक जलप्रवाह या सर्वांचा पुनर्भरणावर परिणाम होतो. आदर्श परिस्थितीत माती-मुरुम-झिजलेला खडक आणि त्याखालील जलवाहक संरचना यांच्यामध्ये योग्य संपर्क असल्यास पावसाचे पाणी तुलनेने प्रभावीपणे जलधरापर्यंत पोहोचू शकते. मात्र अशी परिस्थिती संपूर्ण पाणलोटात सर्वत्र आढळेलच असे नाही.

त्यामुळे पाणलोट क्षेत्राची सरासरी पुनर्भरण क्षमता ही प्रत्येक ठिकाणच्या प्रत्यक्ष पुनर्भरण क्षमतेचे प्रतिनिधित्व करत नाही. याच कारणामुळे कृत्रिम पुनर्भरणाची संरचना निवडताना स्थानिक भूजलशास्त्राचा विचार अत्यावश्यक ठरतो. संरचना आधी आणि भूजलशास्त्र नंतर, हा क्रम वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. उलट भूशास्त्रीय व जलवैज्ञानिक तपासणी → अनुकूल जागेची निवड → योग्य संरचना → प्रत्यक्ष परिणामाचे निरीक्षण, असा क्रम आवश्यक आहे.

जलसंधारणाच्या संरचना : संख्या नव्हे, परिणाम महत्त्वाचा :

महाराष्ट्रात समतल चर, शोषखड्डे, जलतारा, नाला बांध, लघुबंधारे, पाझर तलाव आणि विविध प्रकारच्या पुनर्भरण संरचना मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. या सर्व संरचनांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार महत्त्व आहे. पाण्याचा वेग कमी करणे, मृदा धूप कमी करणे, काही काळ पाणी साठवणे, स्थानिक आर्द्रता वाढवणे आणि झिरपा वाढवणे यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. मात्र प्रत्येक संरचनेचा अंतिम परिणाम खोल जलधराच्या पुनर्भरणात झाला आहे, असे गृहीत धरणे योग्य नाही. एखाद्या शोषखड्ड्याच्या खाली कमी पारगम्य थर असल्यास पाणी उथळ स्तरातच थांबू शकते. समतल चरामुळे अपधाव कमी झाला तरी मातीची झिरपण्याची क्षमता कमी असल्यास पुनर्भरण मर्यादित राहू शकते.

एखाद्या लघुबंधाऱ्यात पाणी साठले तरी त्याचा संबंधित खोल जलधराशी पुरेसा संपर्क नसेल तर जवळच्या बोअरवेलच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ होईलच असे नाही. म्हणूनच जलसंधारणाच्या कामांचे मूल्यमापन “किती संरचना उभारल्या?” या एकाच निकषावर न करता “त्यांनी किती अतिरिक्त आणि टिकाऊ भूजल पुनर्भरण घडवून आणले?” या प्रश्नावर करणे अधिक वैज्ञानिक ठरेल.

धाराशिवमधील निरीक्षणे काय सांगतात? :

२०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील अभ्यासादरम्यान पाहण्यात आलेली काही निरीक्षणे या संकल्पनेला स्थानिक संदर्भ देतात. जुने पाझर तलाव सुस्थितीत असलेल्या किंवा त्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न झालेल्या भागातील लाभक्षेत्रात भूजलस्थिती तुलनेने चांगली आढळते. यावरून स्थानिक भूशास्त्र, साठवण क्षमता आणि जलधराशी संपर्क अनुकूल असल्यास पृष्ठीय जलसाठ्यांचा भूजलावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. नदी, नाले आणि ओढ्यांवर बंधारे बांधलेल्या काही भागांत काठालगतच्या क्षेत्राला लाभ झालेला दिसतो.

मात्र त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर पाणी लागणाऱ्या पिकांमुळे भूजलउपसा वाढल्यास हा लाभ टिकून राहत नाही. यामुळे भूजलसुरक्षेची दुसरी बाजू स्पष्ट होते—पुनर्भरण किती झाले याइतकेच उपसा किती झाला हेही महत्त्वाचे आहे. विहीर आणि बोअरवेल पुनर्भरणाबाबत अजूनही मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय जनजागृतीची आवश्यकता आहे. योग्य जलधर, पाण्याची गुणवत्ता आणि संरचनात्मक वैशिष्ट्ये समजून घेतल्याशिवाय केलेले पुनर्भरण अपेक्षित परिणाम देईलच असे नाही.

पूरानंतर विहीर पुन्हा कोरडी का पडते? : अतिवृष्टीनंतर विहिरीतील पाणी वाढून काही दिवसांनी पुन्हा कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पूरापूर्वी जलधरातील उपलब्ध साठा कमी असू शकतो. अतिवृष्टीतील मोठा हिस्सा अपधाव म्हणून वाहून गेला असू शकतो. जमिनीत मुरलेले पाणी उथळ स्तरातच राहिले असू शकते. पुनर्भरणाचे ठिकाण आणि विहीर ज्या जलधरावर अवलंबून आहे त्यांच्यात पुरेसा संपर्क नसू शकतो. अतिवृष्टीनंतर दिसणारी पाणीपातळीची वाढ तात्पुरती असू शकते. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाऊस थांबल्यानंतर भूजलउपसा वेगाने सुरू झाल्यास पुनर्भरणाचा परिणाम अल्पावधीत कमी होऊ शकतो. यामुळे पूरानंतर बोअरवेल कोरडी पडणे हे स्वतःमध्ये पूराचे पाणी “वाया गेले” याचे प्रमाण नाही. त्या घटनेचे स्पष्टीकरण जलधराच्या जलवैज्ञानिक प्रतिसादातून शोधावे लागते.

भूजल पुनर्भरणाचे मूल्यांकन कसे करावे? : भविष्यातील भूजल व्यवस्थापनासाठी केवळ पर्जन्यमान मोजणे पुरेसे नाही. पाणलोटनिहाय पर्जन्यमान आणि त्याची तीव्रता, अपधावाचे प्रमाण, मातीची झिरपण्याची क्षमता, भूशास्त्रीय रचना, जलधराची खोली, भेगा-सांधे, जलपातळी, पाण्याची गुणवत्ता, पुनर्भरण संरचनांचे स्थान आणि भूजलउपसा या घटकांचा एकत्रित अभ्यास आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही जलसंधारणाच्या कामाचे यश मोजताना संरचनांची संख्या हा प्राथमिक निर्देशक असू शकतो; परंतु अंतिम निर्देशक म्हणून जलपातळीतील बदल, विहीर-बोअरवेलचा प्रतिसाद, पाणी उपलब्ध राहण्याचा कालावधी, पुनर्भरणाची अनुमानित मात्रा आणि भूजलउपशाच्या तुलनेत साठ्यात झालेला निव्वळ बदल यांचा विचार करणे आवश्यक आहे.

यासाठी निवडक निरीक्षण विहिरींचे मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर मोजमाप, पावसाच्या घटनांनंतर जलपातळीतील बदलांचे कालानुक्रमिक निरीक्षण, पाणलोटनिहाय जलसंतुलन आणि आवश्यकतेनुसार भूभौतिकीय व जलवैज्ञानिक तपासणी यांचा वापर करता येतो. अशा प्रकारे “संरचना उभारली” पासून “जलधरात मोजता येण्याजोगा बदल झाला” या दिशेने मूल्यांकनाची वाटचाल होऊ शकते.

पाणी अडविण्यापासून जलधर भरण्यापर्यंत: महाराष्ट्राच्या भूजल व्यवस्थापनासमोर आजचा मूलभूत प्रश्न केवळ पाणी अडविण्याचा नाही. प्रश्न आहे, अडवलेले पाणी योग्य जलधरापर्यंत पोहोचते का? जलसंधारणाची पारंपरिक संकल्पना मुख्यतः पाण्याचा वेग कमी करणे, पाणी साठवणे आणि जमिनीत मुरवणे याभोवती केंद्रित होती. आता त्याला जलधराधारित दृष्टिकोनाची जोड देणे आवश्यक आहे.

कोणत्या पाणलोटात कोणता जलधर आहे, त्याची पुनर्भरण क्षमता किती आहे, त्याचा पृष्ठीय जलस्रोतांशी संपर्क कसा आहे, कोणत्या खोलीवर पाणी उपलब्ध आहे आणि त्या जलधरावर किती उपशाचा दबाव आहे, हे समजून घेऊनच हस्तक्षेप निश्चित केले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून पाहिल्यास “पूर आला, पण भूजल भरले नाही” हा विरोधाभास राहत नाही. पाऊस हा भूजल पुनर्भरणाचा आवश्यक घटक आहे; पण तो पुरेसा घटक नाही. पर्जन्यमान → अपधाव → झिरपा → जलधराशी संपर्क → पुनर्भरण → साठवण → भूजलउपसा → उपलब्धता, ही संपूर्ण साखळी समजून घेतल्याशिवाय भूजलसुरक्षेचे वास्तव आकलन होणार नाही.

धाराशिवचा अनुभव त्यामुळे केवळ एका जिल्ह्याचा प्रश्न राहत नाही. तो महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या पुढील टप्प्याचा संकेत देतो. पुढे आपल्याला “किती पाणी अडवले?” यापेक्षा “किती पाणी जलधरात पोहोचवले आणि किती काळ टिकवले?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटी, “पूराचे पाणी गेले कुठे?” या प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर एका वाक्यात देता येत नाही. त्यातील काही पाणी अपधाव म्हणून वाहून गेले असेल, काही मातीमध्ये साठले असेल, काही उथळ जलधरात गेले असेल, काही खोल जलधरात पोहोचले असेल आणि काही काळानंतर भूजलउपशातून पुन्हा वापरले गेले असेल.

नेमका वाटा ठरवण्यासाठी स्थानिक जलसंतुलन आणि जलधराचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणूनच भविष्यातील जलव्यवस्थापनाची दिशा स्पष्ट आहे—पाणी फक्त अडवायचे नाही; पाणी कोणत्या जलधरासाठी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या मार्गाने आणि किती काळासाठी उपलब्ध करून द्यायचे, हे ठरवायचे आहे.

जलसंधारणाच्या प्रत्येक कामाचा अंतिम प्रश्न हा असला पाहिजे की, त्याने भूजलसाठ्याच्या दृष्टीने मोजता येण्याजोगा आणि टिकाऊ परिणाम निर्माण केला का? याच ठिकाणी “पाणी अडविण्यापासून जलधर भरण्यापर्यंत” हा बदल आवश्यक ठरतो. कारण जलसंधारणाचा अंतिम उद्देश केवळ पाण्याला थांबवणे नाही; योग्य पाणी, योग्य ठिकाणी, योग्य जलधरात आणि पुरेशा कालावधीसाठी साठवणे हीच खरी भूजलसुरक्षा आहे. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group