बारामती : दारूच्या नशेत बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या एका चालकावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस गस्त आणि नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पांडुरंग पानगे (वय ४७, रा. पानगेवस्ती, कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती) हा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. MH-42-B-7644) दारूच्या नशेत चालवत असल्याचे गस्तीवरील पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले व ब्रीथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली.
या तपासणीत त्याच्या शरीरात रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळून आले, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप धोत्रे यांच्या फिर्यादीवरून संतोष पानगे याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पन्हाळे (ब.नं. ९९०) करत आहेत.










