सचिन पवार, सुपे
बारामती तालुक्यातील दंडवाडी येथे मंगळवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास ज्ञानदेव बाबुराव जगताप यांच्या स्लॅबच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कालप्रमाणेच आजही बारामतीत विविध ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. याच दरम्यान बारामती तालुक्यातील सुपे शेजारच्या दंडवाडी भागात आभाळ भरून आले आणि नंतर विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळल्याने ज्ञानदेव जगताप यांच्या घरातील वीजेचे वायरिंग तसेच विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच सुपे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. काल इंदापूर तालुक्यातील चिखली गावातील अभिजीत माने या शेतकऱ्याच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून नारळाचे झाड पेटले होते. मात्र आज बारामती तालुक्यात चक्क एका घरावरच वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.










