शेतकरी संघटनांचे नगरपरिषदेला पत्र; बाजार पूर्ववत सुरू करण्याची मागणी
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील गणेश मार्केटमधील पारंपरिक गुरुवारचा आठवडे बाजार बंद करण्याच्या निर्णयाला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बाजार बंद करण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करून शेतकरी आणि विक्रेत्यांच्या हिताचा विचार करीत आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड पांडुरंग रायते, बसपाचे नेते काळुराम चौधरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
गणेश मार्केटमधील गुरुवारचा आठवडे बाजार अनेक वर्षांपासून सुरू असून, बारामती शहरासह परिसरातील शेतकरी या बाजारात आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळते, तर ग्राहकांनाही शेतमाल थेट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होते. अशा पारंपरिक बाजारपेठेवर गदा आणण्याऐवजी प्रशासनाने शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी मांडली आहे.
बाजार परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण किंवा स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्यास त्यावर योग्य नियमन आणि पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या समस्या सोडविण्याऐवजी थेट आठवडे बाजार बंद करणे हा शेतकरी आणि छोट्या विक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम करणारा निर्णय ठरू शकतो, असे संघटनेने पत्रातून नमूद केले आहे. त्यामुळे बाजार बंद न करता वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि विक्रीच्या जागांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आठवडे बाजार स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्यास शेतकरी, विक्रेते आणि संबंधित घटकांना विश्वासात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. बाजाराच्या भवितव्याबाबत प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी भूमिकाही संघटनेने स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.










