जादूटोण्याच्या नावाखाली छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण; गुंगीचे औषध मिसळलेला प्रसाद देऊन व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांचा संशय, डार्क वेबवर विक्री केल्याची चौकशीत कबुली
सेलम, तामिळनाडू : जादूटोणा आणि विधी करण्याच्या नावाखाली महिलांसह अल्पवयीन मुलींचे चित्रीकरण करून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात उघडकीस आला आहे. वाझपडी परिसरात कथित तांत्रिक केंद्र चालवणाऱ्या विजयराजा (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे ५० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयराजा हा वाझपडीजवळ ‘शनेश्वर’ नावाचे केंद्र चालवत होता. जादूटोणा आणि विधीच्या नावाखाली तो लपवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करून महिला आणि मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचा आरोप आहे. काही महिलांना गुंगीचे औषध मिसळलेले पाणी किंवा प्रसाद दिला जात असे. संबंधित महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचे चित्रीकरण केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे व्हिडिओ एका वेबसाइटवर पाठवून पैसे मिळवत असल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डार्क वेबवर व्हिडिओ विक्री केल्याच्या आरोपाचीही तपासणी सुरू आहे.
विनायक चतुर्थीनिमित्त देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक तरुण आरोपीच्या केंद्रावर पोहोचले. गर्दी जमल्याचे लक्षात येताच आरोपीने परिसर बंद करून तेथून पळ काढला. मात्र, तो जवळच लपून बसल्याचे समजल्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडले आणि वाझपडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
भांड्यांचा कारखाना बंद झाल्यानंतर बनला तांत्रिक
पोलिसांच्या माहितीनुसार, विजयराजा पूर्वी एका भांड्यांच्या कारखान्यात काम करत होता. कारखाना बंद झाल्यानंतर त्याची नोकरी गेली. त्यानंतर त्याने बाबा आणि गूढविद्येचा तज्ज्ञ असल्याचे भासवत जादूटोण्याचे केंद्र सुरू केले. चौकशीदरम्यान, एका वेबसाइटकडून अशा व्हिडिओंसाठी पैसे मिळत असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलांचे व्हिडिओ तयार करून संबंधित वेबसाइटवर पाठवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. लॅपटॉपमध्ये आढळलेल्या व्हिडिओंची तपासणी सुरू असून, या प्रकरणात इतर व्यक्ती किंवा कोणतेही डिजिटल नेटवर्क सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे. महिलांना गुंगीचे औषध देणे, छुप्या कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करणे आणि अल्पवयीन मुलींशी संबंधित गंभीर लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










