दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावरील पाटस येथील जुनी कडा वसाहतीजवळील धोकादायक वळणावर अखेर प्रशासनाने उपाययोजना सुरू केली आहे. या वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक बसविण्याच्या कामाला शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. मागील आठवड्यात याच ठिकाणी पाटस येथील एका तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे.
जुनी कडा वसाहतीजवळील हे वळण वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. या ठिकाणी रस्ता वळणाचा असल्याने भरधाव वेगातील वाहनांवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. यापूर्वीही या परिसरात अपघातांच्या घटना घडल्या असून, या धोकादायक वळणावर कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधक बसवावेत, तसेच वाहनचालकांना धोकादायक वळणाची पूर्वकल्पना देण्यासाठी आवश्यक दिशादर्शक व सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये होती. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या भीषण अपघातात पाटस येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत धोकादायक वळणावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत अष्टविनायक रस्ते प्रशासनाने अखेर गतिरोधक बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
काटेरी झुडपांमुळेही अपघाताचा धोका
दरम्यान, केवळ गतिरोधक बसवून प्रश्न सुटणार नसून रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काटेरी झुडपांकडेही प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जुनी कडा वसाहतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून, त्यामुळे वळणावर समोरून येणारी वाहने चालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. त्यामुळे गतिरोधकांसोबतच रस्त्यालगतची काटेरी झुडपे तातडीने हटवून वळणावरील दृश्यमानता वाढवावी, तसेच आवश्यक ठिकाणी धोकादर्शक फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










