भिगवण : बारामती–भिगवण मार्गावर अपघात करून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि त्यावरील चालकाचा भिगवण पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा शोध घेत चालकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे हद्दीत बारामती–भिगवण रस्त्यावर कोठारी फार्मजवळ ही घटना घडली. अज्ञात वाहनाचा चालक वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उंडवडी, ता. इंदापूर) यांच्या ताब्यातील बुलेट मोटारसायकलला धडक झाली.
या अपघातात साहिल भोसले गंभीर जखमी झाले. त्यानंतर अपघाताची माहिती न देता संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातानंतर वाहनाचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. ग्रामीण भागात सीसीटीव्हीची मर्यादित उपलब्धता आणि रात्रीची वेळ यामुळे तपास अधिक कठीण झाला होता.
मात्र, भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली. त्यातून अपघातास कारणीभूत ठरलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची क्रॉस कार (क्रमांक एमएच ४२ एएस ८१२३) तसेच तिच्या चालकाचा शोध लागला.
पोलिसांनी विरेंद्र मनोहर सोनवणे (वय ४७, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अवघ्या सहा दिवसांत अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा व चालकाचा शोध घेतल्याने भिगवण पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नाना सुर्यवंशी, रामदास कचेरे, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर आणि दत्तात्रय गवळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस अंमलदार नाना सुर्यवंशी करीत आहेत.










