२५ सप्टेंबरपर्यंत कार्यवाहीचा अल्टिमेटम; अन्यथा महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा
निंबूत-बारामती : मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या दोन एकर उसाची महावितरणच्या विद्युत तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे राखरांगोळी झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. पुरंदर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवरील कोळेवस्ती परिसरात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, डोळ्यांसमोर उभे पीक जळताना पाहून संबंधित शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
या दोन एकर ऊसासाठी आतापर्यंत तब्बल दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. कष्टाने आणि मोठ्या अपेक्षेने उभ्या केलेल्या पिकाची एका क्षणात राख झाल्याने त्याच्यावर मोठे संकट ओढवले आहे. “आयुष्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली. एवढ्या कष्टाने उभा केलेला ऊस डोळ्यांसमोर जळून खाक झाला,” अशी व्यथा शेतकऱ्याने व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच सोमेश्वर कारखान्याचे संचालक घटनास्थळी दाखल झाले आणि जळीत क्षेत्राची पाहणी केली. मात्र सध्या कारखाना बंद असल्याने जळालेला ऊस कारखान्यात नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पर्यायी मार्गाने दिलासा मिळावा आणि जळालेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांबाबत महावितरणला यापूर्वीच अनेकदा सूचना करण्यात आल्याचे सोमेश्वर कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र विद्युत तारांबाबत योग्य ती दुरुस्ती किंवा आवश्यक उपाययोजना वेळेत न झाल्याने अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाखो रुपये खर्च करून शेतकरी पीक उभं करतो. मात्र अशा प्रकारे काही क्षणांत त्याची राखरांगोळी होते. मग शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या घटनेनंतर महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २५ सप्टेंबरपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दोन एकर ऊस जळून मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई कोण देणार? विद्युत तारांमधून ठिणग्या पडण्यास कारणीभूत परिस्थितीची जबाबदारी कोणाची? तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणकडून ठोस उपाययोजना कधी होणार? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










