बारामती : केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीयकृत बँकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज बारामतीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)सह विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस साप्ताहिक सुट्टी मिळावी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बँकिंग क्षेत्रातही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा वाढता ताण, बदलती बँकिंग व्यवस्था आणि डिजिटल युगातील वाढलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आवश्यक असल्याचे आंदोलक अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.











