शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस अडवून चालक व वाहकास मारहाण करीत तिकीट विक्रीची रक्कम जबरीने चोरणाऱ्या चौघांना शिरूर पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.या गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत सविस्तर असे की,दि. ४ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कनिफनाथ फाटा येथील मंदिराजवळील न्हावरे फाट्याजवळ एसटी बस क्रमांक एमएच १४ एनपी ०८३८ ही स्कॉर्पिओ मधून आलेल्या आरोपींनी अडवून बसचालक व वाहकास शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर दोघांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.या प्रकरणी बसचे वाहक सतीश अण्णासाहेब भापकर यांची तिकीट विक्रीची जमा झालेली ८ हजार ९६० रुपयांची रक्कम आरोपींनी जबरीने काढून घेतली असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.तसेच घटनास्थळी पडलेला दगड उचलून बसच्या समोरील काचेवर मारून काच फोडली आणि बसची चावी घेऊन आरोपी तेथून पसार झाले.
या प्रकरणी संदीप गणपत थोरवे, रा. शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी गांभीर्य ओळखून आरोपींच्या शोधार्थ तपास पथके रवाना केली होती.
शिरूर पोलिसांनी शिरूर, अहिल्यानगर, आळंदी, भोसरी व निगडी परिसरात तपास करत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करून आरोपींचा माग काढण्यात आला. या प्रकरणात अजयकुमार शिनू चव्हाण (वय २४), पवन मधुकर घोलप (वय २५), आकाश सोमनाथ काळे (वय २१) आणि सचिन अशोक घोलप (वय २२) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना आळंदी, भोसरी व निगडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार (क्रमांक एमएच १४ एमडब्ल्यू ५२३४) जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत. हा तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण,पोलिस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निखिल रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने केला.










