बारामती : दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेल्या बारामतीतील तीन तरुणांवर दिवे घाटात काळाने घाला घातला. दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय गौरव चव्हाण (रा. आमराई, बारामती) याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहीहंडीच्या निमित्ताने बारामतीतील आमराई परिसरातील तिघे तरुण दुचाकीवरून पुण्याकडे निघाले होते. दिवे घाट परिसरातून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्त्यावर घसरली आणि तिघेही खाली पडले. याचवेळी मागून आलेल्या वाहनाच्या चाकाखाली गौरव चव्हाण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणावर वाटेतच मृत्यू ओढवल्याने बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातही दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मृत्यूची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक दुचाकी आणि इतर वाहनांतून प्रवास करतात. त्यामुळे वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे, ही खबरदारीच अशा दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते.










