बारामती : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून विनापरवाना डीजे वाजवल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी, पुणे यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांबाबत संबंधितांना सूचना व लेखी नोटिसा देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिरदर्गा मैदान, माळेगाव येथे काही जणांनी दहीहंडीचा संघ जमवून विनापरवाना डीजे वाजविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी चिथावणीखोर स्वरूपाची गाणी वाजवून एकमेकांना खुन्नस देत सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या प्रकरणी केशव गुलाब भोसले, जयपाल भालचंद्र भोसले, रमेश भाऊसो गव्हाणे (रा. माळेगाव बुद्रुक) आणि परशुराम केरू गडदे (रा. चौफुला, ता. दौंड) यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०, २९२ तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम ५२/१८२ व ३९/१९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एमएच १४ एझेड ७२६९ आणि एमएच ०४ जीआर १७५६ क्रमांकाची दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार २२१३ सय्यद करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार २५७७ अवघड यांनी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते व पोलिस अंमलदारांनी केली.
दरम्यान, दहीहंडी, गणेशोत्सव तसेच अन्य सण- उत्सवांच्या काळात नागरिकांनी पोलिसांच्या सूचना व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे. विनापरवाना डीजे, चिथावणीखोर गाणी, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या प्रकारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे माळेगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे.










