राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत मागील दोन महिन्यात तब्बल पाच ते सहा आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील महिला आणि तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने ही बाब अधिक गंभीर आणि चिंताजनक मानली जात आहे.
पाटस आणि वरवंड परिसरातील गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक वाद,आर्थिक विवंचना व कर्जबाजारीपणा, प्रेमप्रकरणातून नैराश्य, व्यसनाधीनता आणि वैयक्तिक नैराश्य ही प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे. यवत पोलिसांकडून प्रत्येक घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.
ग्रामीण भागात पूर्वी अशा घटना तुरळक घडत होत्या, मात्र गेल्या दोन महिन्यात अचानक वाढले प्रमाण हे समाजस्वास्थ्यासाठी धोक्याची घंटा आहे. तरुण वयातच जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जात असल्याने पालक वर्गातही भीतीचे वातावरण आहे.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, संवादाचा अभाव, मोबाईल व सोशल मीडियाचा अतिवापर, अपेक्षांचे ओझे आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही या मागची महत्त्वाची कारणे आहेत.
या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केवळ पोलीस तपास पुरेसा नाही. यासाठी वरवंड आणि पाटस प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत स्तरावर मोफत मानसिक समुपदेशन शिबिरे घेणे गरजेचे आहे, शाळा, महाविद्यालये आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून आत्महत्या प्रतिबंधक जनजागृती करणे आवश्यक आहे. दरम्यान, शासनाच्या १०४ आरोग्य हेल्पलाईन आणि किरण मानसिक आरोग्य हेल्पलाईन – १८००-५९९-०१९ चा प्रचार गावोगावी होणे गरजेचे आहे.
तसेच कुटुंबात संवाद वाढवा, शेजाऱ्यांकडे लक्ष द्या आणि कोणताही व्यक्ती नैराश्यात दिसल्यास त्याला एकटे न सोडता मदतीचा हात द्या, असे आवाहन सुजाण नागरिकांकडून केले जात आहे.
मात्र, वाढत्या आत्महत्येच्या या घटनांची गंभीर दखल घेऊन यवत पोलीस व पाटस पोलीस प्रशासनाने यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक संघटना, महिला बचत गट, पालक आणि ग्रामस्थांमधून होत आहे.










