बारामती : दूध डेअरी व्यवसायासाठी घेतलेली रक्कम परतफेड करण्यासाठी दिलेला चेक वटला नसल्याने दाखल करण्यात आलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात बारामती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत सहा महिन्यांची साधी कैद आणि ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेतून २९ लाख ९० हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर १० हजार रुपये दंड म्हणून शासनाच्या मे. कोर्टात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा निकाल न्यायाधीश प्रितेश भंडारी यांनी दिला.
कन्हेरी येथील शंकर विठ्ठल काळे यांनी कन्हेरी गावातील संतोष सोमनाथ करे यांना दूध डेअरी व्यवसायासाठी हातउसनी रक्कम दिली होती. सदर रक्कम परत करण्याबाबत करारनामा करण्यात आला होता. करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे रक्कम परत करण्याचे मान्य करून आरोपीने फिर्यादीला दोन धनादेश दिले होते. मात्र, हे दोन्ही धनादेश बँक खात्यात भरल्यानंतर वटले नाहीत. त्यामुळे शंकर काळे यांनी बारामती न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणाची सुनावणी बारामती येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समोर झाली. फिर्यादीतर्फे फौजदारी प्रकरणात अॅड. राजेंद्र काळे यांनी काम पाहिले. फिर्यादीने स्वतःसह दोन साक्षीदारांचा पुरावा, न वटलेले धनादेश, करारनामा, बँकेचे मेमो, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती तसेच नोटीस बजावल्याचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला.
आरोपीने बचावासाठी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये धनादेश हा केवळ सिक्युरिटी म्हणून दिला होता, नोटीसची बजावणी झाली नाही आदी हरकती घेण्यात आल्या होत्या. मात्र, फिर्यादी आणि आरोपींकडून सादर करण्यात आलेल्या कागदोपत्री तसेच तोंडी पुराव्याचे सविस्तर अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने आरोपी संतोष सोमनाथ करे याला दोषी धरले.
न्यायालयाने आरोपीला सहा महिने तुरुंगवास आणि ३० लाख रुपयांची शिक्षा सुनावली. तसेच ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे निर्देश देत, त्यापैकी २९ लाख ९० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित १० हजार रुपये दंड म्हणून न्यायालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड. राजेंद्र काळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहकारी म्हणून अॅड. आदेश काळे, अॅड. अजित शेरकर, अॅड. अमोल आटोळे, अॅड. श्रीकांत काटे, अॅड. प्रगती माळवे, अॅड. कांचन कदम, अॅड. नंदिनी मदने, अॅड. आरती कदम, अॅड. तुषार कवडे, अॅड. मनीष जाधव, अॅड. संतोष भोंडे आणि अॅड. आकाश साबळे यांनी सहकार्य केले.










