दौलतराव पिसाळ, वाई :
वाई शहरातील पवित्र स्थळांवर मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरोधात वाई पोलिसांनी विशेष मोहीम राबवून १२ मद्यपींना ताब्यात घेतले. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड तसेच विविध स्मशानभूमी परिसरात एकाच वेळी कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींवर वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
मंदिरांच्या मागील परिसरात दारू पिऊन बाटल्या फोडणे, भाविकांना त्रास देणे, पसरणी घाटावरील कट्ट्यांवर बसून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कचरा टाकणे, तसेच कृष्णा नदीकाठच्या घाटांवर आणि स्मशानभूमीजवळ मद्यपान करून शिवीगाळ व धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींविरोधात वाई पोलिसांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
वाई शहरातील विविध पवित्र आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांमुळे भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
कारवाईसाठी वाई पोलीस ठाण्यातील चार विशेष पथके तयार करण्यात आली. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, स्मशानभूमी परिसर तसेच इतर संवेदनशील ठिकाणी ही पथके एकाच वेळी रवाना करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध ठिकाणी छापे टाकले.
यावेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच शिवीगाळ करणाऱ्या १२ इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना तातडीने वाई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून रात्री उशिरापर्यंत कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. या कारवाईमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाई शहरातील धार्मिक, पर्यटन आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज भोसले, उमेश लोखंडे, प्रसाद दुदूस्कर, राम कोळी, गोरख दाभाडे, विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे तसेच होमगार्ड अभिजीत येवले यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.










