बारामती : शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मारवाड पेठ ते तांदुळवाडी वेस चौक या मार्गावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निता अविनाश गावडे या २९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता मारवाड पेठेतून तांदुळवाडी वेस चौकाच्या दिशेने जात होत्या. त्या चौकाजवळ पोहोचल्या असताना अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर संशयिताने तेथून पलायन केले. दरम्यान, या घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. संशयिताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून फुटेजची तपासणी केली जात आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच बारामतीतील गरुडबाग रस्ता परिसरातही एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे शहरातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा वावर आहे का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेऊन अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











