खून शून्यावर; खून-प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी व चैन स्नॅचिंगमध्येही घट
बारामती : बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत निवडक गंभीर गुन्ह्यांचा आलेख मागील वर्षाच्या तुलनेत ६.५ टक्क्यांनी घटल्याचा दावा बारामती विभाग पोलिसांनी केला आहे. जुलै २०२५ अखेर १७० असलेली दहा प्रमुख गुन्हेगारी प्रकारांची संख्या जुलै २०२६ अखेर १५९ वर आली आहे. विशेष म्हणजे खुनाचे गुन्हे दोनवरून थेट शून्यावर आले असून खून व खुनाचा प्रयत्न मिळून १३ वरून १० झाले आहेत.
पोलिसांनी जाहीर केलेल्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, खुनाच्या गुन्ह्यांत १०० टक्के घट झाली आहे. खुनाचा प्रयत्न ११ वरून १०, बलात्कार १६ वरून १३, जबरी चोरी १४ वरून ८, चैन स्नॅचिंग १० वरून ७, तर दुखापतीचे गुन्हे ९१ वरून ८६ झाले आहेत. खून व खुनाचा प्रयत्न हे दोन्ही गंभीर गुन्हे एकत्रितपणे सुमारे २३ टक्क्यांनी घटले आहेत.
शहर आणि माळेगावात घट; तालुक्यात मात्र वाढ
पोलीस ठाणेनिहाय आकडेवारीतही वेगवेगळे चित्र दिसून येत आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दहा निवडक गुन्ह्यांची संख्या ६२ वरून ५२ वर आली असून सुमारे १६ टक्के घट झाली आहे. माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३८ वरून ३० गुन्हे झाले असून सुमारे २१ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
मात्र, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत याच गुन्ह्यांची संख्या ७० वरून ७७ वर गेली आहे. म्हणजेच एकूण गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असतानाच काही गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न ५ वरून २, जबरी चोरी ७ वरून ५, चैन स्नॅचिंग ७ वरून ३ आणि दुखापतीचे गुन्हे ३५ वरून ३३ झाले आहेत. मात्र गर्दीमारामारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ या एकूण आकडेवारीवर परिणाम करणारी ठरली आहे.
पोलिसांच्या या आकडेवारीत काही गुन्ह्यांची वाढही स्पष्टपणे दिसून येते. दरोड्याचे गुन्हे दोनवरून चार झाले आहेत, तर गर्दीमारामारीचे गुन्हे २४ वरून तब्बल ३१ झाले आहेत. त्यामुळे एकीकडे गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला तरी गर्दी, मारामारी आणि दरोड्यांची वाढ हे पोलिसांसमोर आव्हान कायम असल्याचे आकडेवारीतून दिसते. पोलिसांनी या वाढीची दखल घेत संबंधित आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी गट आणि उपद्रवी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधक व तपासात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे सांगितले आहे.
‘गुन्हा घडल्यानंतर तपास’ऐवजी ‘गुन्हा घडू न देण्यावर’ भर
बारामती विभाग पोलिसांनी यापुढे केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यापुरती भूमिका न ठेवता गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविण्याचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी, तडीपार आरोपींची तपासणी, दिवस-रात्र पेट्रोलिंग, नाकाबंदी, संवेदनशील ठिकाणी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती, फरार व पाहिजे आरोपींचा शोध, वॉरंट बजावणी तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासह प्रतिबंधक कायद्यांचा वापर केला जात आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) मधील प्रतिबंधक तरतुदींचा वापर करून शांतता भंगाची शक्यता असलेल्या व्यक्तींविरुद्ध बॉण्डची कारवाई केली जात असून बॉण्डच्या अटींचा भंग करणाऱ्यांविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सराईत आणि दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पात्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५, ५६ तसेच इतर लागू तरतुदीनुसार तडीपार कारवाई केली जात आहे. तर सातत्याने धोकादायक कृत्ये करणाऱ्या आणि कायदेशीर निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे प्रस्ताव सादर केले जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
आकडेवारी घटली, पण आव्हाने कायम
पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार निवडक दहा गुन्ह्यांमध्ये एकूण ११ गुन्ह्यांची घट झाली आहे. खून शून्यावर येणे, जबरी चोरी व चैन स्नॅचिंगमध्ये झालेली घट ही पोलिसांसाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडक गुन्ह्यांची एकूण संख्या वाढणे, दरोड्यांमध्ये दुप्पट वाढ होणे आणि गर्दीमारामारीचे गुन्हे २४ वरून ३१ वर जाणे ही आव्हानेही कायम आहेत.










