राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील नांदूर येथील चेरी कंपनीच्या (पूर्वीची मालवा मिराज) आवारात गेट बंद करून तब्बल 70 ते 100 मोठ्या वृक्षांची बेकायदा तोड केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. 22) उघडकीस आला. विशेष म्हणजे वृक्षतोडीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांनाही कंपनीचे गेट बंद असल्याने आत प्रवेश करता आला नाही. अखेर संरक्षक भिंतीवरून उडी मारून अधिकाऱ्यांनी कंपनीच्या आवारात प्रवेश करत वृक्षतोड थांबवली.
नांदूर येथील बोराटे वस्ती परिसरातील गट क्रमांक 94/1 आणि 94/2 मध्ये हा प्रकार घडला. शेतकरी अमोल बोराटे यांच्या निदर्शनास कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे आले. त्यांनी तत्काळ पोलिस आणि वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर परिसरातील सुमारे 20 ते 25 शेतकरीही घटनास्थळी जमा झाले.
माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक भोंडवे आणि म्हस्के तसेच पोलीस अधिकारी गवारे घटनास्थळी दाखल झाले. मात्र कंपनीचे मुख्य गेट बंद असल्याने अधिकाऱ्यांना आत जाता आले नाही. अखेर संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश करून सुरू असलेली वृक्षतोड थांबविण्यात आली.
काही तासांत मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली. संबंधित कंपनी गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या कंपनीच्या आवारात वर्षानुवर्षे वाढलेली मोठी झाडे होती. मात्र काही तासांतच 70 ते 100 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे हिरवाईने नटलेला परिसर उद्ध्वस्त झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या वृक्षतोडीसाठी वनविभागाची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकी कोणत्या प्रजातींची किती झाडे तोडण्यात आली, तोडलेल्या लाकडाची विल्हेवाट कशी लावण्यात आली आणि वृक्षतोडीसाठी संबंधित कंपनीकडे कोणती कागदपत्रे आहेत, याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेला माहिती मिळूनही कंपनीचे गेट बंद ठेवण्यात आल्याने अधिकाऱ्यांना भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करावा लागला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्याचे नेमके कारण काय, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
परवानगीशिवाय वृक्षतोड झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित कंपनीचे मालक आणि जबाबदार व्यक्तींवर वृक्षसंवर्धन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची पाहणी करून वृक्षतोडीचा पंचनामा व अहवाल तयार केला जाणार का, तसेच दोषींवर कोणती कारवाई होणार, याकडे दौंडसह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










