बारामती : बारामती शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक मार्केट परिसरात भर रस्त्यावर स्वतःची पेट्रोलवरील दुचाकी जाणीवपूर्वक पेटवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या आणि अग्निशामक दलाच्या वेळीच झालेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या प्रकरणी गणेश विठ्ठल माने (वय 39, रा. कैकाडगल्ली, बुरुडगल्ली रोड, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 285, 292, 287 व 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सुभाष चौकात एका व्यक्तीने मोटारसायकल पेटवून दिल्याची आणि तो मोठ्याने आरडाओरडा करत असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर हिरो स्प्लेंडर (क्रमांक MH 13 Q 0673) ही काळ्या रंगाची दुचाकी सार्वजनिक रस्त्यावर पेटलेल्या अवस्थेत आढळून आली. दुचाकीतून मोठ्या प्रमाणावर ज्वाळा आणि धूर निघत होता. सुभाष चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा बाजारपेठेचा भाग असल्याने त्या वेळी नागरिक, दुकानदार, पादचारी तसेच वाहनांची मोठी वर्दळ होती.
प्राथमिक तपासात संबंधिताने स्वतःचीच दुचाकी पेटविल्याचे निष्पन्न झाले. दुचाकीच्या इंधन टाकीत पेट्रोल असल्यामुळे आग अधिक भडकून स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक, दुकानदार, पादचारी आणि वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. आग इतर वाहनांपर्यंत किंवा दुकानांपर्यंत पोहोचली असती तर मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पेटलेल्या दुचाकीजवळच संबंधित व्यक्ती हातात पेटती सिगारेट घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत फिरत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे आग इतरत्र पसरण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेमुळे काही काळ सुभाष चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत अन्य कोणतेही वाहन, दुकान किंवा इमारतीचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल गोरख चौधर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोंढे करीत आहेत.










