मुंबई : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित पोस्टबाबत खेद व्यक्त करताना ती कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून संवादातील गैरसमजामुळे (Miscommunication) प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये, स्त्रीदाक्षिण्य आमच्यासाठी सर्वोतोपरी आहे. काँग्रेसने केलेले ट्वीट प्रसंगिक होते, व्यक्तिगत नव्हते. त्याचा विपर्यास करू नये असे नमूद केले आहे. तसेच इंग्रजीत त्यांनी सुनेत्रा जी पवार यांच्याबाबत पोस्ट झालेल्या टिप्पणीबद्दल खेद आहे. ती पोस्ट गैरसमजामुळे झाली होती असे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली तर काँग्रेसने महिलांचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या स्पष्टीकरणाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
सपकाळ यांनी या पोस्टमध्ये थेट माफी मागितलेली नसली तरी संबंधित पोस्टबद्दल खेद व्यक्त करत ती वैयक्तिक स्वरूपाची नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाचा विपर्यास न करता वस्तुस्थिती समजून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या खुलाशानंतरही विरोधकांकडून या स्पष्टीकरणावर काय प्रतिक्रिया उमटतात आणि काँग्रेसकडून अधिकृत स्तरावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










