कौटुंबिक वादाचा सूड अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुरड्यावर! पुण्यात झोपलेल्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक; ३ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : कौटुंबिक वादाच्या आगीत निष्पाप जीवाचा बळी घेण्याचा प्रयत्न करणारा एक अत्यंत अमानुष आणि मन विषण्ण करणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. कौटुंबिक भांडणाचा राग मनात धरून एका महिलेने अवघ्या ९ महिन्यांच्या झोपलेल्या चिमुरड्याच्या तोंडात थेट ‘फेविक्विक’ ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बाळाचा जीव वाचला असून, याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे ३१ जुलै रोजी ही घटना घडली. फिर्यादी अल्ताफ नबी शेख यांची पत्नी जैनाब आणि त्यांची भावजय (मुख्य आरोपी) सानिया शेख यांच्यात कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद होत होते. याच वादाचा सूड उगवण्यासाठी सानिया हिने क्रौर्याची सीमा गाठली. घरात गाढ झोपेत असलेल्या अल्ताफ यांच्या ९ महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात तिने फेविक्विक ओतले.
धमक्या आणि पोलिसी कारवाई
या भयानक कृत्यानंतर आरोपी सानिया हिने याबाबत कोणाला सांगाल किंवा पोलिसांत जाल तर जीवे मारेन, अशी धमकी दिली. तर उर्वरित दोन सह- आरोपींनीही, सानियाविरोधात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवत अल्ताफ शेख यांना दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, धमक्यांना न जुमानता बाळाच्या आई-वडिलांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्यामुळे चिमुरड्याचा जीव वाचला असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी अल्ताफ शेख यांच्या फिर्यादीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात आरोपी सानिया शेख आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस सध्या तीव्रतेने शोध घेत आहेत.










