‘
बारामती : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो बेरोजगार तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्ती करून देण्याचे आश्वासन देत तब्बल ११७ उमेदवारांची ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात सुबायू सरकार उर्फ राणा (रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) आणि प्रमोद भगवान गुरव (रा. घणसोली, नवी मुंबई; मूळ रा. उंड, ता. कराड, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बारामतीतील सूर्यनगरी परिसरातील रणजित हरीभाऊ मोढे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रमोद गुरव याच्या माध्यमातून फिर्यादीची सुबायू सरकार याच्याशी ओळख झाली. दोघांनीही आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, रेल्वे, ओएनजीसीसह विविध सरकारी विभागांत थेट नोकरी मिळवून देण्याचा दावा केला. यापूर्वी अनेक उमेदवारांना सरकारी सेवेत रुजू केल्याचा बनाव करून त्यांनी बेरोजगार तरुणांचा विश्वास संपादन केला.
भरती प्रक्रियेच्या काळात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरून घेत, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील नोकरीसाठी प्रत्येकी सुमारे पाच लाख रुपये, तर रेल्वेतील नोकरीसाठी सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रोख आणि ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम जमा करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
फसवणुकीचा प्रकार अधिक विश्वासार्ह वाटावा यासाठी आरोपींनी उमेदवारांना बनावट निवड याद्या, खोटे शिक्के असलेली नियुक्तीपत्रे आणि प्रशिक्षणासाठी बोलावल्याची कागदपत्रेही दिली. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही सरकारी सेवेत नियुक्ती मिळाली नाही. संशय आल्याने उमेदवारांनी चौकशी केली असता संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणात एकूण ११७ जणांकडून ३ कोटी ७३ लाख रुपये उकळल्याचा आरोप असून, बारामती तालुका पोलीस आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.










