ज्ञानेश्वर रायते, बारामती
एखादा मुलगा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला, राज्यात पहिला आला किंवा अधिकारी बनला की संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघते. फटाक्यांची आतषबाजी होते, गल्लीबोळात कौतुकाचे मोठमोठे फ्लेक्स लागतात आणि व्यासपीठावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. “मला समाजाची सेवा करायची आहे, गरिबांचे कल्याण करायचे आहे,” अशी मोठमोठी आणि गुळगुळीत भाषणे छाती ठोकून दिली जातात. पण, हीच ‘MPSC ची रत्ने’ जेव्हा खुर्चीवर बसतात, तेव्हा त्यांना जनतेचे रक्त शोषण्याची आणि पैसे उकळण्याची एवढी खुमखुमी कुठून येते? असा संतापजनक प्रश्न आज प्रत्येक सामान्य नागरिकाला पडला आहे.
याचाच जिवंत आणि तितकाच किळसवाणा पुरावा बीडमध्ये समोर आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि ५ लाख खऱ्या व ४० लाखांच्या बनावट नोटा स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
MPSC च्या एसटी प्रवर्गातील ‘टॉपर’चा खरा चेहरा!
विशेष म्हणजे, हे महाशय २०१६ च्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात पहिले आले होते! “स्वतःवर विश्वास, सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी असली की यश मिळते,” अशा वल्गना करून तरुण पिढीला ‘आदर्श’ दाखवणारा हा टॉपर प्रत्यक्षात किती खालच्या थराला जाऊ शकतो, हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
जेव्हा राज्यात प्रथम आलेला अधिकारी ४५ लाखांची प्रचंड लाच मागायला धजावतो, तेव्हा प्रशासनातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांची काय गत असेल? वृक्षलागवडीची बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे हक्काचे थकीत वेतन देणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी या लाचखोराने थेट लाखांच्या पटीत दरोडा टाकला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची बैठक संपवून घरी पोहोचताच त्याने आपल्याच घरात ही लाचेची रक्कम स्वीकारली.
आता अशा ‘लाचखोरांचे’ सत्कार करायचे का?
हा प्रकार पाहिल्यानंतर आता एक गंभीर आणि रास्त प्रश्न निर्माण झाला आहे— भविष्यात सरकारी नोकरीत लागलेल्या कोणत्याही नवख्या अधिकाऱ्याचा गावात सत्कार करावा की नाही? ज्यांच्या सत्कारासाठी गाव पेटून उठते, ज्यांना डोक्यावर घेऊन मिरवले जाते, तेच अधिकारी खुर्चीवर बसताच जनतेच्या आणि हाताखालील कर्मचाऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊन पैसे उकळतात. नव्याने सरकारी सेवेत रुजू झालेल्या तरुण अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे हे कीड वेगाने पसरत चालले आहे.
हीच का तुमची देशसेवा?
MPSC आणि UPSC च्या मुलाखतींमध्ये “मला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे आहे” अशी पोपटपंची करणारे अधिकारी प्रत्यक्षात मात्र जनतेच्या पैशांवर दरोडे घालणारे दलाल बनत आहेत. श्रीनिवास लखमावाड सारख्या ‘टॉपर’ने केवळ स्वतःचे तोंड काळे केले नाही, तर रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो निष्पाप विद्यार्थ्यांच्या विश्वासावरही नांगर फिरवला आहे. अशा लाचखोर आणि पांढरपेशा दरोडेखोरांचे सत्कार थांबवून, त्यांना थेट समाजातून बहिष्कृत करण्याची वेळ आता आली आहे. प्रशासनाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड ठेचून काढल्याशिवाय या व्यवस्थेत सुधारणा होणे शक्य नाही!










