बारामती : बारामती तालुक्यातील सुपे परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सुपे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकीची चावी देणाऱ्या पालकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला असून, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांत सुपे परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये अल्पवयीन मुलांनी भरधाव दुचाकी चालविताना नियंत्रण गमावल्याने ट्रकखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनी संपूर्ण परिसर हादरला असून, अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. शाळा किंवा महाविद्यालयात येणाऱ्या कोणत्याही अल्पवयीन विद्यार्थ्याकडे दुचाकी आढळल्यास संबंधित वाहन तात्काळ जप्त करण्यात येईल. तसेच वाहन चालविणाऱ्या अल्पवयीनासह त्याचे पालक आणि वाहनमालक यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात सुपे पोलीस स्टेशनकडून सर्व शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज सकाळच्या प्रार्थनेवेळी विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली जावी, तसेच हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावण्याचे महत्त्व, वेगमर्यादेचे पालन आणि सुरक्षित वाहनचालकाचे नियम याबाबत नियमित मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाने विशेषतः पालकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देणे ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी. सध्या सुपे पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्यामुळे शाळा, महाविद्यालये, पालक आणि नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले आहे. सलग घडलेल्या अपघातांनंतर पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे अल्पवयीनांच्या बेजबाबदार वाहनचालकाला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










