शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील तांदळी येथील वयोवृद्ध वारकरी केरू खोरे या आजोबांची शिरूरचे तहसीलदार यांनी घरी जाऊन भेट घेत माहिती घेतली.तसेच जमिनीवर बसून विचारपूस केली. तांदळी हे शिरूर तालुक्यातील शेवटचे टोक. या गावातील केरु खोरे या वयोवृद्ध वारकरी आजोबांची वारीत एका वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रसिद्ध झाली होती.
त्यानंतर ते राज्यभर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुटुंबातील पत्नी, दोन मुले यांचे अकाली निधन झाले आहे तसेच त्यांना जमीन व इतर कुठलाही आधार नाही. दररोज ते स्वतः हाताने स्वयंपाक करत आहेत. परिस्थिती बेताची असली तरी ते स्वाभिमानी आयुष्य जगत आहे. त्यांची व्यथा समजल्यानंतर शिरूर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी थेट तांदळी गावी सकाळी येऊन भेट दिली.
चटईवर जमिनीवर बसून विचारपूस केली. ग्रामस्थांशी चर्चा केली. ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे बाळासाहेब म्हस्के यांनी आश्वासन दिले. शासन म्हणून आम्ही खंबीरपणे आम्ही सोबत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.










