बारामती, दि. २८ : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका महिला वकिलाची फसवणूक, तिच्याशी सहजीवन ठेवत लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा घेणे, मुलीचा स्वीकार करण्यास नकार देणे तसेच धमकी दिल्याप्रकरणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार, बकल क्र. ५६१, सध्या नियुक्ती खडकी, पुणे) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २९७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९, ८१, ३५१(२), ३५१(३) आणि ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व्यवसायाने वकील असून सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने सातत्याने संपर्क ठेवून स्वतः पत्नीपासून विभक्त असल्याचे सांगत फिर्यादीशी कायदेशीर विवाह करणार असल्याचे वारंवार आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी बारामती येथे आला. आर्थिक अडचणीचे कारण सांगून त्याने फिर्यादीकडून ४० हजार रूपये घेतले. त्यानंतर बारामतीतील एका लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी प्रथम शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने नातेवाईकांसह फिर्यादीच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. तसेच एका मंदिरात गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घालून “आता तू माझी पत्नी आहेस” असे सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. जेऊर आणि निंभोरे परिसरातही आरोपीने तिचा पत्नी म्हणून परिचय करून दिल्याने विवाहाचे आश्वासन खरे असल्याचा विश्वास निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सहजीवनादरम्यान फिर्यादी गर्भवती राहिली. मात्र त्यानंतर आरोपीचे वर्तन बदलले. गर्भधारणेदरम्यान कोणतीही जबाबदारी न स्वीकारणे, मानसिक त्रास देणे आणि उपचारासाठी मदत न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीला कन्यारत्न प्राप्त झाले. ही मुलगी आरोपीपासून झाल्याचा दावा फिर्यादीने केला असून, आरोपीने मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिला तसेच तिच्या संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय आरोपीने फिर्यादी आणि तिच्या नातेवाईकांकडून विविध कारणांनी रोख व ऑनलाइन स्वरूपात पैसे घेतले असून त्यातील मोठी रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणे, तडजोडीसाठी धमक्या देणे आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचाही उल्लेख फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणाच्या तपासात मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, छायाचित्रे, व्हिडिओ, लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील दृश्यफीत, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व प्रसूतीचे अभिलेख तसेच आर्थिक व्यवहारांचे बँक रेकॉर्ड आदी पुराव्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बारामती शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सर्व तांत्रिक, वैज्ञानिक आणि दस्तऐवजीय पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. कायद्यानुसार पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या वृत्तातील सर्व आरोप हे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर आधारित असून त्यांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत व पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.










