निलेश भोंग, इंदापूर
इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे जमीन विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्यानंतर घरात एकटी असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुभाष संभाजी डरंगे, शिवाजी दशरथ जगताप आणि दशरथ नामदेव आसबे या तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या जबाबानुसार, दि. 09/03/2026 रोजी आरोपी सुभाष डरंगे याने 4 गुंठे जमीन 2 लाख 60 हजार रुपयांना विकण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी बनावट नोटरी दस्त व ग्रामपंचायतीचा खोटा नमुना-8 चा दाखला तयार केला. त्यापोटी 1 लाख रुपये घेतले. उर्वरित रक्कमेसाठी फिर्यादींना “जिवे मारण्याची” धमकीही देण्यात आली. चौकशीत सदर जागा व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर दि. 08/07/2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती बाजारात गेले असता, आरोपी तिघे घरी आले. घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीला “तुझे आईबाप कुठे आहेत, पैसे द्यायचे कळत नाही का” असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी शिवाजी जगताप याने “हिला धर” असे सांगितल्यानंतर सुभाष डरगे याने मुलीचा हात धरून अंगाकडे ओढले व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलीच्या आरडाओरड्याने आरोपी पळून गेले.
“ते मोठे लोक आहेत” या भीतीपोटी सुरुवातीला तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.










