शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेली चिमुकली भाग्यश्री संदीप वारे हिच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने दहा लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनिषा कटके यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.
पीडित कुटुंबाला मदतीचा धनादेश आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनिषा कटके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी जुन्नर वनविभागाच्या सहायक उप वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या की, शासन आणि वनविभाग ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे असून सर्वतोपरी आम्ही मदत करत आहोत असे त्यांनी सांगितले
आमच्या कुटुंबावर अशी वेळ आली पण इतर कुटुंबावर अशी वेळ येऊ नये यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे अशी प्रतिक्रिया मृत भाग्यश्री चे वडील संदीप वारे यांनी व्यक्त केली.
यावेळी माणिकडोहचे पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे, वनपाल भानुदास शिंदे नितीन म्हात्रे, वनरक्षक गणेश डोईफोडे, घोडगंगाचे माजी संचालक शशिकांत वेताळ, फत्तेसिंग वाबळे, सुनील फलके, संतोष फराटे इनामदार, इंद्रजित वाळूज, ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










