राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात अवैध गावठी पिस्तुल खरेदी विक्री करणाऱ्या अथवा बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई करत पाटस येथून एका संशयिताला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी यवत परिसरातून तीन आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल जप्त केल्यानंतर आता पाटसमधील ही दुसरी मोठी कारवाई ठरली असून, तालुक्यात अवैध शस्त्रांचा वाढता सुळसुळाट चिंतेचा विषय बनला आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाटस चौकातील चांगुना हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. यावेळी गावठी पिस्तूल बाळगून उभा असलेल्या सनी कुमार केसरी प्रसाद याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई गुरुवारी (दि. 9) रात्री करण्यात आली.
अटक करण्यात आलेला सनी कुमार केसरी प्रसाद (रा. डोमणीमऊ, मोहम्मदपूर नोगवाँ, इलाहाबाद, उत्तर प्रदेश; सध्या रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सचिन घाडगे, असिफ शेख, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, सुभाष राऊत, योगेश नागरगोजे आणि विकास कापरे यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांत झालेल्या सलग दोन कारवायांमुळे दौंड तालुक्यात अवैध गावठी पिस्टलचा पुरवठा नेमका कुठून होत आहे, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक गुन्हे शाखेसमोर उभे राहिले आहे. पोलिसांनी या रॅकेटचा सखोल तपास सुरू केला असून, आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











