बारामती : महान्यूज लाईव्ह
दूधाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांपर्यंत सुरक्षित व दर्जेदार दूध पोहोचावे या उद्देशाने बारामती तालुका सहकारी दूध संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या बैठकीतील निर्णयानुसार गुरुवार दि. ९ जुलै २०२६ पासून नंदन डेअरी, माळेगाव बु., निरा चिलिंग सेंटर तसेच बल्क कुलर विभागामार्फत दूध संकलन करणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांसाठी दूध गुणवत्तेचे शासनमानक बंधनकारक करण्यात आले आहेत.
बारामती तालुका सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी याबाबत अधिकृत परिपत्रक काढून सर्व प्राथमिक दूध संस्थांचे चेअरमन व सचिवांना तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिपत्रकानुसार संकलित होणाऱ्या दुधामध्ये किमान ३.२ टक्के फॅट आणि किमान ८.३ टक्के एस.एन.एफ. (सॉलिड्स-नॉट-फॅट) असणे आवश्यक राहील. तसेच दुधातील प्रोटीनचे प्रमाण एस.एन.एफ.च्या ३४ टक्के प्रमाणानुसार असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने निश्चित केलेल्या या निकषांपेक्षा दूध कमी प्रतीचे आढळल्यास संबंधित दूध स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे दूध संकलन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या दुधाला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दूध उत्पादकांनी जनावरांच्या पोषणावर, स्वच्छ दुग्धव्यवस्थापनावर आणि दूध काढण्याच्या स्वच्छ पद्धतींवर विशेष भर देण्याची गरजही या निर्णयामुळे अधोरेखित झाली आहे. दूध संघाने सर्व प्राथमिक दूध संस्थांनी संबंधित निकषांची त्वरित अंमलबजावणी करून गुणवत्तेबाबत कोणताही हलगर्जीपणा करू नये असे आवाहन केले आहे. शासन मानकांनुसारच दूध स्वीकारले जाणार असल्याने येत्या काळात दूध उत्पादक आणि संस्थांना गुणवत्तेच्या बाबतीत अधिक दक्ष राहावे लागणार आहे.











