नीरा, ता. पुरंदर
नीरा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणातून नीरा नदीपात्रात एकूण 6,037 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. ८ जुलै) सायंकाळी ६ वाजल्यापासून वीर धरणाच्या सांडव्यावरून 4,637 क्यूसेक आणि एस्केपमधून 1,400 क्यूसेक असा एकूण 6,037 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
धरण परिसरासह नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी 576.75 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणात 67.31 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पाटबंधारे विभागाने सांगितले की, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात वेळोवेळी वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नदीपात्र, पूल आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, नदीकाठावरील जनावरे आणि शेतीसाठी ठेवलेले साहित्य सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवावे, सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
नीरा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांनुसारच वर्तन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.











