राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी 6 जुलै 2026 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रात्री उशिरा हे आदेशाचे परीपत्रक काढले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. IMD च्या अंदाजानुसार उद्या अतिवृष्टीसह वीज, मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार खालील सर्व शाळांना दि. 06/07/2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे,त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, खाजगी, अनुदानित, विना-अनुदानित, इंग्लिश मिडीयम शाळा आणि सर्व अंगणवाडी सुट्टी असल्याने बंद राहणार आहेत. सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहावे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे.
दरम्यान, पावसाची अपडेट आणि प्रशासनाचे पुढील आदेश जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दिले जातील.











