पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे महापालिकेत नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला असताना आता याच प्रकरणात लाखो रुपयांची डील झाल्याचे समोर आले आहे. नोकरीसाठी दिलेले तीस लाख रुपये परत मागतानाचे व संबंधित एजंटसोबत चर्चा होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे तयार करून तरुणांना लुटण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेचे बोधचिन्ह आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या हुबेहूब उमटवल्या जात आहेत. हे आदेश खरेखुरे वाटत असल्याने त्यांची सत्यता तपासणे अवघड झाले आहे. चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी नोकऱ्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची उलाढाल या रॅकेटमध्ये समोर आल्याने महापालिकेतील अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी बोगस भरती प्रकरणाशी संबंधित तीन व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकले आहेत. त्यामध्ये एक व्यक्ती तिघांशी संवाद साधत असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. मी तुम्हा तिघांना ३० लाख रुपये दिले होते. ते मला परत करा, ते पैसे देतानाचेही व्हिडिओही देखील माझ्याकडे आहेत. आम्हाला वेडे समजू नका असे ती व्यक्ती बजावत आहे.
कुंभार म्हणाले, ”महापालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्यासाठी महापालिकेसारखी समांतर यंत्रणा उभी करून महापालिकेचे बोधचिन्ह वापरून ४००-५०० तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यांना बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यात तरुणांकडून लाखो रुपये उकळण्यात आले असून, हा घोटाळा कोट्यावधी रुपयांचा आहे. यात महापालिकेने फौजदारी कारवाई केली पाहिजे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर म्हणाले, ‘यासंदर्भात पीडित व्यक्तीने अधिकृतपणे पुराव्यांसह तक्रार केल्यास आमच्याकडून पुढील कारवाई केली जाईल.”










