अनिल गवळी, पुणे
हवेली तालुक्यातील आर्वी येथे पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले असून 25 वर्षीय विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.
मृत महिलेचे नाव ऋतुजा अक्षय तावरे (वय 25, रा. आर्वी, ता. हवेली, जि. पुणे) असे असून तिच्या पश्चात दीड वर्षांचा मुलगा युवराज आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर आरोपी पती अक्षय रामदास तावरे (वय 28, रा. आर्वी) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 225/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103 व 85 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा हिचे लग्न 16 मे 2023 रोजी अक्षय तावरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे आणि कथित मारहाणीमुळे ऋतुजा काही महिन्यांपूर्वी माहेरी पणदरे येथे राहण्यासाठी आली होती. या वादाचे निराकरण करण्यासाठी प्रकरण बारामती येथील महिला आयोगापर्यंत गेले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीनंतर तडजोड झाली आणि ऋतुजा पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी गेली होती.
मात्र, तडजोडीनंतरही वैवाहिक जीवनातील मतभेद कायम राहिल्याचे समोर आले. काही काळानंतर पुन्हा वाद वाढल्याने ऋतुजा एप्रिल 2026 मध्ये माहेरी पणदरे येथे आली होती. त्यानंतर 4 मे रोजी तिला पुन्हा सासरी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही घरगुती तणाव कायम राहिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास आर्वी येथील राहत्या घरी आरोपी अक्षय तावरे याने पत्नी ऋतुजाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांकडून नातेवाईकांना देण्यात आली. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र श्लोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृत महिलेचा भाऊ अनिकेत दादासाहेब पवार (रा. पणदरे, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत आरोपीने वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत अखेरीस पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मयूर महादेव निंबाळकर करीत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने आर्वी परिसरात खळबळ उडाली असून दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.











