अॅड सचिन वाघ, बारामती
10 वीला 45% पडल्यामुळे मला सायन्समध्ये ‘क’ डिव्हिजन मिळाली. साहजिकच मार्कांप्रमाणे दर्जा असणारे मित्र वर्गात आले. अत्यंत सज्जन वातावरणातून मी जबरदस्त बदल असणाऱ्या ‘क’ तुकडीत आलो होतो. तिथे कॉलेजमध्ये एक शाळा आणि कॉलेजच्या बाहेर एक शाळा होती.
साहजिकच आम्ही बाहेरच्या शाळेचे विद्यार्थी झालो. त्यातच आमच्या वर्गात गोजे आला. गोजेला लगेच श्रीमंत व्हायचं होतं आणि आपण कसेही त्या स्पर्धेकडे जाणारे नसल्याने आम्ही तिकडे बघितले नाही. वाऱ्याच्या वेगात जसे आम्ही कॉलेजला आलो, तितक्याच वेगात नापास झालो. बहुतेक गोजे पण नापास झाला असेल…पण पुन्हा काही गोजेची भेट झाली नाही.
एक दिवशी वकील झाल्यानंतर एका वॉरंटमध्ये त्याला पकडून आणल्यावर तो मला दिसला. साहजिकच मित्र असल्यामुळे मी त्यावेळी पैशांची जुळवाजुळव करून, प्रसंगी स्वतःकडील काही पैसे भरून त्याचा जामीन केला. त्यावेळीदेखील हात चोळत आणि आळोखे-पिळोखे देत तो म्हणाला, “सचिन, आपण लवकरच श्रीमंत होणार आहोत.” असे म्हणून दोन दिवसांत तुझे पैसे देतो असे आश्वासन देऊन तो एक महिन्यासाठी गायब झाला. त्यावेळी लोकांच्या चिरीमिरीच्या पैशांनी मला खूप टेन्शन आले होते. पण गोजेला काही ताण वाटला नाही.
गोजेला स्कीम विकायचा खूप नाद होता. तो नेहमी वेगवेगळ्या स्कीम विकायचा. श्रीमंत होण्याचा त्याचा कॉन्फिडन्स कदाचित अंबानीपेक्षाही खतरनाक होता. साधारणतः एक वर्षाने गोजे पुन्हा गावात दिसला. त्यावेळी त्याने नवीन कार घेतली होती. कपड्यांवरून तो श्रीमंत झाला असं वाटत होतं. तो म्हणाला, “काय रे, पैसे पैसे करतोस. चल, तुला दाखवतो.” बघतो तर कारमध्ये पैसेच पैसे होते. त्याने नक्कीच काहीतरी स्कीम कोणाला तरी विकली आहे हे माझ्या लक्षात आले.
महिन्याच्या आतच त्याने एम .एल .एम . मार्केटमध्ये घोटाळा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही लोक त्याला शोधत होते. त्याच्यावर गुन्हाही झाला. अनेकांनी त्याला श्रीमुखात प्रसाद पण दिला. तो प्रसाद गोड मानून त्याने काही तक्रार न करता खाल्ला. मला भेटल्यावर त्याने मलाच सांगितले, “काळजी करू नको सचिन, आपण एक दिवस खूप श्रीमंत होणार आहोत.”
काही दिवसांनी मी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. त्यावेळी कापसे साहेब बसले होते. शेजारी गोजेला दोन पायांवर बसवले होते. मी म्हणालो, “साहेब, काय केलं याने?” साहेब म्हणाले, “खोटंनाटं सांगून लोकांना फसवतोय.” मी म्हणालो, “काय रे, खरं आहे का?” तो मला म्हणाला, “आता काय, लोकांना विश्वास नाही तर मी काय करू? माझ्याकडे ज्वालामुखीचा दगड आहे. तो घेतला की शक्ती प्राप्त होते, सगळे आजार दूर होतात आणि माणूस आंतरिक शक्तिमान होतो.”
मला तर हसू आवरेना. परंतु मला दुसरे काम असल्यामुळे ते सोडून मी कामाला गेलो. त्यानंतर 10-12 दिवसांनी मी पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा मला पाहताच कापसे साहेबांनी मला जोरात हाक मारली… “ओ वाघ साहेब, इकडं या की!” मी गेलो तर मला म्हणाले, “अहो, तो तुमचा मित्र कुठे आहे?” मी – “कोणता? गोजे?” ते म्हणाले, “हा… तोच. अहो, त्याने फसवलं की मला!”
मी – “कसं काय?”. कापसे साहेब – “त्यादिवशी त्याने मला त्या दगडाचं लय महत्त्व सांगितलं राव. अन् 1700 रुपयांना मला घ्यायला लावला, शिवाय मी त्याला सोडून पण दिलं.” मी – “मग?” कापसे साहेब – “मग काय… अहो, डुप्लिकेट दगड आहे तो. त्याने मला स्कीम दिली राव!” मी त्यांच्या गळ्यातला काळ्या दोऱ्यात बांधलेला दगड बघून हसू लागलो…
कापसे साहेब – “त्याला सोडणार नाही. मला सापडल्यावर!” मी – “हो साहेब… तुम्हाला तो सापडला तर पाहिजे!” असं म्हणत हसत निघून आलो… माझ्या डोळ्यांसमोर मात्र “आपण लवकरच श्रीमंत होणार आहोत…” असं म्हणणारा गोजे उभा राहिला..!











