राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील बुलेट गाड्यांच्या मॉडिफाइड सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला अखेर आळा बसला आहे. कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट स्वारांवर पोलीसांनी आणि RTO बारामती यांनी संयुक्त धडक कारवाई केली.
या कडक कारवाईत एकूण ४ बुलेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली. RTO बारामतीचे निरीक्षक काटवटे यांनी या गाड्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार एकूण ७५,८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॉडिफाइड सायलेन्सर काढणे, आवाज मर्यादेपेक्षा जास्त असले हॉर्न जप्त करणे यासारखी कारवाईही करण्यात आली.
यवत पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी पहिलीच मोठी कारवाई पाटस परिसरातील ध्वनिप्रदूषणावर केली, यवत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, राजीव शिंदे, राजेंद्र जाधव, मोहम्मद अली मड्डी, हेमलता भोंगळे, जालिंदर बंडगर, नुतनकुमार जाधव, पोलीस शिपाई विनोद काळे, रवींद्र जानगवली, राजकुमार कोकरे, वाहतूक अंमलदार रवींद्र जायभाये, प्रमोद शिंदे , भुलेश्वर मरले आदींच्या पथकाने ही कार्यवाही केली.
दरम्यान, रात्री-बेरात्री बुलेटच्या “फटफट” आवाजामुळे लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. तसेच रस्त्यावर अनावश्यक रेसिंग आणि स्टंट बाजीला प्रोत्साहन मिळत होते. पाटस पोलीसांनी ही कारवाई म्हणजे आता गप्प बसणार नाही असा जणु स्पष्ट इशारा दिला आहे.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या गाडीचे सायलेन्सर मॉडिफाय करू नये. नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करु नये. तसे आढळून आल्यास संबंधित दुचाकी आणि दुचाकी चालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशारा पोलिसांनी या कारवाईतुन दिला. पोलिसांच्या या कारवाईवर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.










