सचिन पवार, सुपे (बारामती):
‘अधिकारी असावा तर असा!’ याचा जिवंत प्रत्यय नुकताच बारामती तालुक्यातील सुपे येथे तीन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा धसका सध्या संपूर्ण महाराष्ट्राने घेतला आहे. पण सुपे बाजारात तर केवळ एका ‘अफवेने’ जे काही घडवून आणलं, ते पाहून सध्या संपूर्ण तालुक्यात हशा पिकला आहे, तर दुसरीकडे प्रामाणिकपणाचा एक मोठा धडाही मिळाला आहे.
…अन् पाहता पाहता बाजारपेठ झाली ‘गायब’!
बारामती तालुक्यातील सुपे ही पंचक्रोशीतील एक मोठी आणि विकसित बाजारपेठ. रोजची पैशांची आणि ग्राहकांची मोठी वर्दळ. पण काल दुपारी अचानक बाजारात एक सुसट सुटलेली हवेसारखी बातमी आली—”अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची टीम सुपे शहरात दाखल झालीये!”
बस्स! हा निरोप मिळताच सुपे बाजारात एकच खळबळ उडाली. मग काय? किराणा माल दुकानदार, हॉटेल्स, स्वीट मार्ट्स यांनी ग्राहकांना सामान देणं अर्धवट सोडून थेट शटर खाली खेचले. छोटे-मोठे टपरीधारक आणि गाडेवाले यांनी आपले गाडे सुसाट सुरक्षित ठिकाणी पळवले. अगदी पाणी फिल्टर (Water प्लांट) चालकही कुलूप लावून गायब झाले. अवघ्या काही मिनिटांत गजबजलेला सुपे बाजार एखाद्या लॉकडाऊनसारखा शांत झाला. ग्राहकांना कळेना नक्की झालंय काय? अचानक दुकानं का बंद झाली?
दोन तासांचा सस्पेन्स आणि ‘गुपित’ उघड!
जवळपास दोन ते तीन तास सुपे बाजारात सामसूम होती. दुकानदार आजूबाजूला लपून ‘अधिकारी गेले का?’ याचा अंदाज घेत होते. शेवटी, जेव्हा खात्री पटली की कोणतीही टीम आलेली नाही आणि ती केवळ एक अफवा होती, तेव्हा दोन-तीन तासांनंतर हळूहळू शटर वर उचले गेले. संध्याकाळी जेव्हा दुकानं पुन्हा उघडली, तेव्हा लोकांना या अचानक झालेल्या ‘बंद’मागचं गमतीशीर कारण समजलं आणि संपूर्ण परिसरात एकच हसू आवरत नव्हतं.
‘मुंढे’ नावाचा धडकी भरवणारा पॅटर्न!
या गमतीशीर घटनेच्या मागे एक मोठा धाक आहे आणि तो म्हणजे अन्न आणि भेसळ आयुक्त तुकाराम मुंढे यांचा! मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी केवळ दूध भेसळीविरोधात कडक मोहीम उघडली नाही, तर…सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी “वडापाव किंवा भेळ यापुढे वर्तमानपत्राच्या (News paper) कागदात गुंडाळून विकता येणार नाही” असे कडक संकेत दिले आहेत. त्यांच्या याच धडाक्यामुळे अगदी गल्लीबोळातील टपरीवाल्यापासून ते बड्या उद्योगपतींपर्यंत सगळ्यांनीच ‘FDA’चा मोठा धसका घेतला आहे, हेच या घटनेतून सिद्ध होतं.
गमतीतून प्रेरणा: ‘एक अधिकारी’ काय करू शकतो?
सुपे बाजारातील या पळापळीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना जरी गमतीशीर वाटत असली, तरी ती खूप मोठा प्रेरणादायी संदेश देऊन जाते. एक सक्षम, प्रामाणिक आणि कडक शिस्तीचा अधिकारी जर खुर्चीवर बसला, तर यंत्रणा किती गतिमान होते आणि चुकीचं काम करणाऱ्यांच्या मनात कायद्याचा किती धाक निर्माण होतो, याचं सुपे हे उत्तम उदाहरण आहे. सरकार आणि कायदे जर मनात आणतील, तर समाजाला अगदी सरळ रेषेत आणू शकतात, हाच धडा या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे. सुपे बाजारातील प्रामाणिक व्यापाऱ्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं, पण ज्यांच्या मनात थोडी जरी धाकधूक होती, त्यांच्यासाठी ही ‘अफवा’ आरोग्याशी खेळ न करण्याचा एक कायमस्वरूपी धडा ठरली आहे एवढं मात्र नक्की!











