बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार चाकू आणि चारचाकी वाहनासह दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
माळेगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, कऱ्हावागज परिसरात काही व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन संशयास्पद हालचाली करत आहेत. या माहितीची पडताळणी करून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. संशयितांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, 7.65 एमएमचे एक जिवंत काडतूस, एक धारदार चाकू तसेच वापरात असलेले चारचाकी वाहन आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळीच दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश तात्याराम गावडे आणि मयूर विष्णू मोरे या दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांसह वाहनाचा एकूण ३ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात शस्त्र अधिनियम (Arms Act) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गावठी पिस्तूल व इतर शस्त्रे कोणत्या हेतूने बाळगली होती, ती कुठून मिळवली आणि त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी संबंध आहे का, याचा सखोल तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करून संभाव्य गुन्हे घडण्याची शक्यता या कारवाईमुळे हाणून पाडण्यात आली आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.










