राजेंद्र झेंडे, दौंड
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, तब्बल ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही खांदेपालट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार विविध पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच प्रशासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवीन नेतृत्व मिळणार असून, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने याचे महत्त्व मानले जात आहे.
जिल्ह्यातील बारामती, शिक्रापूर, दौंड, जुन्नर, राजगड, लोणावळा, मंचर, आळेफाटा, तळेगाव दाभाडे आदी भागांतील पोलीस ठाण्यांमध्येही अधिकाऱ्यांची नियुक्ती व बदली करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली असून, तर काहींना विशेष शाखांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
यामध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची शिक्रापूर येथे नियुक्ती करण्यात आली असून बारामती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश पांडुरंग माने यांची भोर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. यवत पोलीस ठाण्यात संतोष वसंत तासगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते.
महादेव नारायण वाघमोडे यांची रांजणगाव एमआयडीसी येथून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून हवेलीच्या पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील यांची महिला कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. नारायण देशमुख यांची यवत पोलीस ठाण्यातून एफ आर ओ पुणे ग्रामीण या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे, तर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात असलेले संतोष घोळवे यांची सासवड पोलीस ठाण्यात तर नारायण पवार यांची नियंत्रण कक्षातून बारामती तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा शाखेतील पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांची सायबर पोलीस ठाण्यात, तर दौंड चे गोपाळ पवार यांची जिल्हा वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांची बारामतीच्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी तर शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांची जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील विकास भुजबळ यांची सुरक्षा शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, तर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
जेजुरीचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर इंदापूरच्या जीवन मोहिते यांची वडगाव निंबाळकरकडे बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सहाय्यक निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांची भिगवणला तर भिगवनचे विनोद जगन्नाथ महांगडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील कुलदीप संकपाळ यांची माळेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिस दलातील या व्यापक बदल्यांमुळे आगामी काळात पोलीस प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः वाढती गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद देण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी लवकरच आपल्या नव्या पदांचा कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये पदभार हस्तांतरणाचे काम सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलातील या मोठ्या फेरबदलाकडे पोलीस विभागासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.










