सचिन पवार : महान्यूज लाईव्ह
सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका थरारक अपहरण प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत सुपा पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. दिवेघाट ते झेंडेवाडीपर्यंत रंगलेल्या या नाट्यमय पाठलागानंतर पोलिसांनी संशयित स्विफ्ट कार अडवून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. या धाडसी कारवाईमुळे अपहरणाचा गंभीर गुन्हा उघडकीस आला असून परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
रविवार (दि. ७ जून) रोजी ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवाडी, ता. बारामती) याचे अपहरण झाल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. लाल रंगाची स्विफ्ट कार (एमएच-४२-बीजे-४४४५) मधून ओंकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंखे यांनी ऋषिकेश याला जबरदस्तीने गाडीत बसवून सासवडच्या दिशेने नेल्याची माहिती समोर आली.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी तातडीने विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. त्याचवेळी जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलीस ठाण्यांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. अपहरणकर्त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
दरम्यान, कुलदीप चांदगुडे यांना आलेल्या एका मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर संशयितांचे लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांच्या पथकाने वेगाने दिवेघाट गाठत संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. दिवेघाटातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून सुरू झालेल्या या थरारक पाठलागादरम्यान सासवड पोलिसांचीही मदत घेण्यात आली. पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जाधव आणि त्यांचे पथक कारवाईत सहभागी झाले. अखेर झेंडेवाडी (ता. पुरंदर) परिसरात पोलिसांनी संशयित स्विफ्ट कारला घेराव घालत अडविले.
वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ओंकार प्रकाश भोसले (वय २७), तन्मय सुधीर साळुंखे (वय २०, सर्व रा. सातव चौक, बारामती) हे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण झालेला ऋषिकेश चांदगुडे याचा शोध घेण्यात आला आणि त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणी ऋषिकेश विजय चांदगुडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ अन्वये बीएनएस कलम १४०(१), ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ओंकार भोसले आणि तन्मय साळुंखे यांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार विशाल गजरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस हवालदार संदीप लोंढे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई संतोष जावीर, पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी, महिला पोलीस हवालदार दिपाली मोहिते, पोलीस शिपाई सचिन दरेकर व पोलीस शिपाई विलास वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.










