संदीप मापारी पाटील बुलढाणा
राजुरा शिवारात आढळलेल्या अज्ञात तरुणीच्या छिन्नविच्छिन्न मृतदेह प्रकरणात धक्कादायक वळण आले असून, जिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तिच्या वडील व भावाला अटक केली होती, ती शिवानी कलमेकर जिवंत असल्याचे समोर आले आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचे गूढ अधिकच गडद झाले असून पोलिसांसमोर नवे प्रश्न उभे ठाकले आहेत.
काही दिवसांपूर्वी राजुरा शिवारात शिर नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तपासादरम्यान हा मृतदेह मध्य प्रदेशातील खकनार येथील बेपत्ता शिवानी कलमेकर हिचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी व भावाने चौकशीत हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली होती.
मात्र, तपास सुरू असतानाच शिवानी स्वतः जिवंत आणि सुखरूप आढळून आली. ती आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याचे उघड झाल्याने पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. या नव्या घडामोडीनंतर तपास यंत्रणेसमोर दोन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. राजुरा शिवारात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे? आणि शिवानी जिवंत असताना तिच्या वडील व भावाने हत्येची कबुली कशी काय दिली?
या प्रकरणामुळे आधीच्या तपासाच्या दिशेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी आता संपूर्ण तपास नव्याने सुरू केला आहे. अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून अटक करण्यात आलेल्या नातेवाईकांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या नाट्यमय घडामोडींमुळे जळगाव जामोद परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, राजुरा शिवारात सापडलेल्या त्या अज्ञात तरुणीचे रहस्य कधी उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











