नवी दिल्ली : महीन्यूज लाईव्ह
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. नुकतंच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत.
शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढवता येणार नाही. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
शिवसेनेनं जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच या निवडणुकांसाठी प्रचारसभांची रणधुमाळी सुरु होणार आहे.











