राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खोबऱ्याने भरलेला टेम्पो पलटी झाल्याचा बनाव रचून 6 लाख 68 हजार रुपयांचे 3615 किलो खोबरे चोरणाऱ्या वाहनचालकासह चार जणांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. चोरीला गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,
भरत मारुल सिद्धाप्पा (रा. चिंकमंगळूर, कर्नाटक ) हा आयशर टेम्पो ( क्र. MH. 47 AS 5368) मध्ये 6 लाख 68 हजार 775 रुपये किमतीचे 3 हजार 615 किलो खोबरे चिंकमंगळूर येथून गुलटेकडी, पुणे येथे विक्रीसाठी पाठवले होते. हा टेम्पो चालक मनोज आंध्रेश बनसोडे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर ) याच्या ताब्यात देण्यात आला होता.
19 मे 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता चालक मनोज बनसोडे याने मालकाला फोन करून कळवले की, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल अनन्याजवळ टेम्पोचा अपघात होऊन पलटी झाला व त्यामधील खोबरे अज्ञात इसमांनी चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जागेची पाहणी केली. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा संशय बळावला. चालक मनोज बनसोडे यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्ह्या केल्याची कबुली दिली.
त्याचे साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार व तुषार लक्ष्मण जगताप, (सर्व रा. राहुरी ) यांच्या संगनमताने टेम्पोमधील खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केला. चोरी लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी
भरत सिद्धाप्पा यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 लाख 68 हजार 775 रुपये किमतीचे 3615 किलो खोबरे व गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त केला आहे.
आरोपींना अटक करून दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने, महादेव जाधव आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.











