पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धाणीवर (कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत) येथे सोमवारी (१८ मे) पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून सुमारे ४० हून अधिक वऱ्हाडी घेऊन एक लहान ट्रक धाणीवरच्या दिशेने जात होता. पहाटे चारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली.
अपघातानंतर अनेक प्रवासी वाहनाच्या पत्र्यात अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात कंटेनर चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघातामागील मुख्य कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











