पुणे : महान्यूज लाईव्ह
कोरेगाव पार्क परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमधून पार्टी करून परतणाऱ्या महिला वकिलाचा धावत्या कारमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला वकील शनिवारी रात्री तिच्या तीन मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. त्यानंतर त्या सर्वजणी दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाल्या. मात्र काही वेळाने तिच्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या आणि महिला एकटी उरली.
याच वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तिला घरी सोडण्याचा बहाणा करत विश्वासात घेतले आणि कारमध्ये बसवले. महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून कारमध्ये प्रवेश केला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान धावत्या कारमध्येच आरोपींनी तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे शहर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, महिला वकिलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू आणि तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.











