इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बऱ्याच कालावधीनंतर इंदापूरात प्रशासकीय यंत्रणेला शिवसेनास्टाईल जाब विचारला गेला. गेल्या दोन वर्षांत कधी तहसील कार्यालयाला असा जाब कोणी विचारलाच नाही.. म्हणजे कोणी विचारायला गेले नाही..सामान्य शेतकऱ्यांना या कार्यालयात नीट बोललेच जात नसल्याने तसेही कोणी त्या वाटेला फिरकत नाही.. या अशा वागण्यास अधिकारी प्रामाणिक काम समजतात. त्यामुळे लोक त्या वाटेला फिरकत नाहीत.. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेलेल्या तक्रारी, अधिकाऱ्यांमधील पराकोटीला गेलेला वाद या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी याआधी ५ ऑगस्ट रोजी कोविडच्या खर्चाची मागणी केली, त्याला उत्तर मिळाले नाही, मुख्यमंत्र्यांनीच तहसीलदारांशी संपर्क साधायला लावले होते असे सांगत संतापलेल्या शिवसेनेच्या वाघांनी तहसील कार्यालयावर धडक मारली.. आणि सुरू झाली, सवाल-जबाबाची मैफल… कधी पदाधिकारी आक्रमक, तर कधी तहसीलदार आक्रमक अशा या २० मिनीटांहून अधिक चाललेल्या फैरीत वाळूपासून सातबारापर्यंत बऱ्याच गोष्टींवर उलटसुलट प्रश्नोत्तरे झाली. यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन बेडशीट वाटली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, इंदापूर शहरप्रमुख महादेव सोमवंशी, विश्वास मांढरे, बारामती जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भिमराव भोसले, अॅड. नितीन कदम, सुदर्शन रणवरे, अरूण पवार, विजय शिरसट, अप्पासाहेब डोंगरे, मंदार डोंबाळे, अंकुश गलांडे, सचिन पाटील, शशांक गांधी, दुर्वास शेवाळे, दत्तू खाडे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना जाब विचारला. या दरम्यान तब्बल २३ मिनीटांची खडाजंगी झाली.
शिवसेना नेते : तहसिलदार मॅडम तुम्ही सामान्यांशी कशा वागता हे आम्हाला चांगलेच माहिती आहे.
तहसीलदार – तुम्ही काय धमकी देता का?
शिवसेना नेते – याला धमकी म्हणता? एकतर तुम्ही झालेली बदली पुन्हा कॅन्सल केलीत
तहसीलदार – माझी बदली मी रद्द केलेली नाही. आणि मला कोणी काढत नाही, मी स्वतः बदलून जात नाही.. मी कधीही कामाची प्रसिध्दी केली नाही. मला ती सवय नाही. आम्ही आमची कामे प्रामाणिकपणे केली आहेत.
शिवसेना नेते – कोविडच्या खर्चाबद्दल ५ ऑगस्ट रोजी पत्र दिले, अजून काहीच कार्यवाही नाही. आम्ही आरोग्यमंत्र्यांना कळवले. मुख्यमंत्र्यांना कळवले. त्यांनी तहसीलदारांना विचारण्यास सांगितले. मात्र आजतागायत दोन ओळीचे पत्र मिळाले नाही. मुख्यमत्र्यांच्या म्हणण्याला काहीच किंमत नाही का?
तहसीलदार – या पत्राला उशीर झालेला आहे हे नक्की. मी आता याला उत्तर देण्याचा आदेश देते. तुम्हाला चार दिवसांत याचे पत्र मिळेल.
शिवसेना नेते – वाळूची वाहतूक व गौण खनिजचे कोठे परवाने दिले आहेत?
तहसीलदार – इंदापूर तालुक्यातील वाळू उपसा पूर्णतः बंद आहे असे मी म्हणणार नाही, मात्र वाळूची वाहतूक टोटली बंद केली आहे. वाळू उपशावर कंट्रोल आहे, कारवाई करतो आहोत.
शिवसेना नेते – पोलिस निरीक्षक आणि तहसीलदारांचे हप्त्यावरून भांडण झाले अशी चर्चा आहे. पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत.
तहसीलदार – वस्तुस्थिती वेगळी आहे. मी त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. कारण मला ते देऊ वाटले नाही.
शिवसेना नेते – तुमचे पती कोविडचे इन्चार्ज कसे काय? पशुसंवर्धन अधिकारी कोविडचा समन्वयक कसा होऊ शकतो?
तहसीलदार – तो माझा निर्णय नाही. ते सीईओचे पत्र आहे, मी नियुक्ती केलेली नाही. प्रांताधिकारी इन्सायडींग कमांडिंग ऑफिसर आहेत. याउलट त्यासाठी आम्हीच पत्र दिलेले आहे, अजून ते बदलून मिळालेले नाही. तुमचा आवाज वाढवू नका..
शिवसेना नेते – आम्ही जनता आहोत, सरकार आमचे आहे, आम्ही मालक आहोत या सरकारचे. या तहसीलदारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत तक्रारी आहेत. आमच्या आवाजाबद्दल बोलू नका.. आमचा आवाजच असा आहे..आम्ही ठरवलंच तर तक्रारींचा पाऊस पडेल.
तहसीलदार – मी तालु्क्याची आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहे. मी ४० बेडसाठी ३०० बेडशीट दिले, तर विचारणा करणारे कोणी आहे की नाही?
शिवसेना नेते – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सात बारावरील इफेक्ट झालेला नाही. इतरही कामे होत नाहीत, केवळ हेलपाटे शेतकऱ्यांना मारावे लागत आहेत.
तहसीलदार – मागील दोन महिन्यांपासून सर्व्हरवर लोड आहे. त्यामुळे सारी प्रक्रिया विलंबगतीने होत आहे. सर्वत्र ही समस्या आहे.
या आणि अशा अनेक प्रश्न उत्तरांची मालिका तशीच सुरू राहीली.. या सवालजवाबाच्या फैरी पाहायच्या असतील, तर महान्यूजच्या फेसबुक पेजवर पाहू शकता..










