अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही वर्षात दुधाच्या बाबतीत व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत विश्वसनीय ब्रँड झालेला अमूल देखील भेसळीच्या क्षेत्रात शिरकाव करू लागला आहे का? लोकांच्या पसंतीचा ब्रँड ठरलेल्या अमूल मध्ये देखील वनस्पती तेलाची भेसळ होते का? अमूलच्या नावाखाली अमूलची नकली कुल्फी विकली जाते का? अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने अमूलच्या कुल्फी साठ्यावर धाड टाकली. प्राथमिक तपासामध्ये या कुल्फीमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणारे वनस्पती तेल आणि फॅट्सची भेसळ असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आहे.
राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढू लागताच नागरिक गारवा मिळवण्यासाठी आईस्क्रीम आणि कुल्फीवर ताव मारत आहेत. मात्र, तुम्ही मोठ्या आवडीने खात असलेली कुल्फी खरोखर शुद्ध दुधाची आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका नामांकित कंपनीच्या कुल्फी साठ्यावर धाड टाकून तब्बल १,८५६ पॅकेट्स जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, या कुल्फीमध्ये आरोग्यास घातक ठरू शकणारे वनस्पती तेल आणि फॅट्सची भेसळ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमकी कारवाई काय?
अन्न व औषध प्रशासनाला गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत पुरवठा होणाऱ्या कुल्फीमध्ये भेसळ होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या पथकाने शहरातील वितरकांना माल पुरवठा करणाऱ्या वाहनाची आकस्मिक तपासणी केली. या तपासणीत कुल्फीच्या पाकिटांवर नमूद घटक आणि प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळल्याने प्रशासनाने तातडीने १८५६ पॅकेट्स जप्त केले.
कायद्याचे उल्लंघन आणि आरोग्याशी खेळ
‘अन्न सुरक्षा आणि मानदे’ कायद्यानुसार, आईस्क्रीम किंवा कुल्फी यांसारख्या पूर्णपणे दुग्धजन्य पदार्थांमध्ये वनस्पती तेल (Vegetable Oil) किंवा बाह्य फॅट्स वापरण्यास सक्त मनाई आहे. कुल्फी ही केवळ दुधाच्या अर्कापासून बनणे अपेक्षित असते. मात्र, नफेखोरीसाठी दुधाच्या फॅट्सऐवजी स्वस्त वनस्पती तेलाचा वापर करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, संबंधित कुल्फीच्या नमुन्यांमध्ये वनस्पती तेलाचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. जप्त केलेला साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असून, अहवाल प्राप्त होताच संबंधित कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
ब्रँडेड कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
ही कारवाई केवळ एका छोट्या विक्रेत्यावर नसून एका नामांकित ब्रँडच्या पुरवठा साखळीवर करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या जाहिरातींना भुलून पदार्थांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संबंधित कंपनीला या प्रकरणावर लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
व्यावसायिकांचे धाबे दणाणले : ऐन उन्हाळ्याच्या हंगामात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे भेसळयुक्त शीतपेये आणि आईस्क्रीम विकणाऱ्या इतर व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. एफडीएने आता जिल्ह्यातील इतर शीतपेय केंद्रांवरही आपली नजर वळवली आहे.
ग्राहकांसाठी सल्ला:
आईस्क्रीम किंवा कुल्फी खरेदी करताना पाकिटावरील घटकांची (Ingredients) नीट तपासणी करा.जर ‘Frozen Dessert’ असे लिहिले असेल, तर त्यात वनस्पती तेलाचा वापर केलेला असतो, हे लक्षात घ्या. भेसळीचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा.











